अकोला: यावर्षी पाऊस अनुकूल व वेळेवर येत असल्याचा अंदाज सुरुवातीला सर्वच हवामानशास्त्र संस्थांनी वर्तविला आहे; परंतु नवीन अंदाजानुसार मॉन्सून लांबल्याचे भाकीत हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात येत असल्याने चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणार्या जिल्ह्यातील शेतकर्यांच्या जिवाची घालमेल सुरू झाली आहे. त्याचे परिणाम मशागत व बियाणे बाजारावर दिसून येत आहेत. मागील आठवड्यात आलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने शेतकर्यांना दिलासा मिळाला होता, आता तर पाऊस नाही आणि तापमानही वाढले आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तर या सर्व पृष्ठभूमीवर आपत्कालीन पीक पेरणीचे नियोजन केले आहे.विदर्भात गत १0 ते १५ वर्षांपासून सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकर्यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम झाले आहेत. कृषी विकासाचा दर शून्यावर आला असून, शेतकर्यांच्या हातात पैसाच नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. यावर्षी उत्तम पावसाचे संकेत सर्वच हवामानशास्त्र विभाग, खासगी संस्थांनी दिल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या; परंतु पाऊस लांबल्याने शेतकर्यांच्या जिवाची घालमेल वाढली आहे. त्यामुळे बियाणे खरेदीसाठी सरसावलेला शेतकरीसुद्धा ह्यवेट अँड वॉचह्णच्या भूमिकेत आहे. शेतकरी दरवर्षी पावसाळ्य़ापूर्वी बी-बियाणे, खते खरेदी करतो. यावर्षी मात्र बियाणे खरेदीस शेतकरी तयार नसल्याचे बाजारातील चित्र आहे. विदर्भात ३0 जूननंतर सार्वत्रिक पावसाला सुरुवात झाल्यास, मुगाचे पेरणीबाबत शेतकरी फेरविचार करीत असतो.दरम्यान, कृषी विद्यापीठाने यावर्षी वेळेवर मॉन्सून येत असल्याचा अंदाज बघून, पीक पेरणीचे नियोजन केले आहे; परंतु मॉन्सून ३0 जूनपर्यंत आला नाही, तर खरिपातील काही पिकांमध्ये बदल करावा लागेल. खरीप हंगामात विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भात आदी पिकांची पेरणी साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते; मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी याच आठवड्यात होणे आवश्यक असते. तथापि, नियमित पावसाळा दोन आठवडे उशिराने सुरू झाल्यास कृषी विद्यापीठाने पीक पेरणीसाठी काही सूचना केल्या आहेत. पश्चिम विदर्भात अडीच लाख क्विंटल विविध पिकांचे बियाणे बाजारात आले आहे. परंतु खरेदी वाढली नसल्याने बियाणे विक्रेते शेतकर्यांची प्रतीक्षा करताना दिसत आहेत.
पावसाळा लांबला; शेतक-यांची घालमेल!
By admin | Published: June 13, 2016 1:54 AM