जिल्ह्यात गत २१ जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती. मूसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आल्याने शेतातील पिके पाण्यात बुडाली तसेच शतजमीनही खरडून गेल्याने शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेती आणि पिकांच्या नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत १० आॅगस्ट रोजी शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार अतिवृष्टी व पुरामुळे जिल्हयातील १ लाख ९६ हजार ६८२ शेतकऱ्यांच्या १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्रावरील शेती आणि पिकांचे नुकसान झाले. शेती व पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अपेक्षित निधीची मागणीही जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आली; मात्र अहवाल पाठवून एक महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही शासनाकडून मदतनिधी अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्हयातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शेती आणि पीक नुकसान भरपाइची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि
पीक नुकसानाचे असे आहे वास्तव !
क्षेत्राचा प्रकार शेतकरी बाधीत क्षेत्र (हेक्टर)
जिरायत पिके १७८०८३ १२१२९५.३६
बागायत पिके १०४१ ५७९.१८
फळपिके ९०९ ५८२. ३३
खरडून गेलेली जमीन १६६४९ ९०३८. ०७
...............................................................................................
११५.३५ कोटींचा मदतनिधी
मिळणार तरी केव्हा?
अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेती आणि पिकांचे नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार १२६ रुपयांच्या अपेक्षित मदत निधीची मागणी महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात करण्यात आली आहे. परंतु शासनाकडून अद्याप मदतनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे शेती आणि पीक नुकसान भरपाइच्या मदतीचा निधी शासनाकडून मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.