लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कारखान्यात काम करताना कल्पना विजयपुरी गोसावी यांच्या हाताचे बोट तुटल्याचे आणि त्यासाठी कारखान्याचे मालक बिपीनकुमार हरनारायण धूत, पर्यवेक्षक महेश गणेश चौधरी हे जबाबदार असल्याचे सिद्ध झाल्याने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम.डी. ननावरे यांच्या न्यायालयाने बुधवारी त्यांना एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. एमआयडीसी क्रमांक ३ मधील अश्लेषा कंपनीमध्ये कल्पना गोसावी या मजूर म्हणून काम करतात. २ जानेवारी २0१0 रोजी कंपनीचे मालक बिपीनकुमार धूत, पर्यवेक्षक महेश चौधरी यांनी तिला जबरदस्तीने लोखंडाच्या पट्ट्या तयार करण्याचे काम दिले. मशीनवर काम करताना कल्पना गोसावी यांच्या हाताचे एक बोट तुटले. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३३८(३४) नुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी बुधवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम.डी. ननावरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने न्यायालयाने त्यांना एक महिन्याचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ ठोसर, अॅड. गोपाल गव्हाळे यांनी बाजू मांडली.
मजुराचे बोट तुटल्याने कारखाना मालकास एक महिन्याचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:38 AM