आकोट : यावर्षी पावसाने चांगलाच ठेंगा दाखविला असून, खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाचा मुहूर्त टळल्यानंतर उशिरा आलेल्या पावसामुळे शेतकर्यांनी केलेल्या पेरण्या काही प्रमाणात उगविल्या. परंतु पावसाने पुन्हा दडी मारल्याने आकोट तालुक्यातील मूग पेरणीचे शेत मोडावे लागले. सध्या सोयाबीन व पर्हाटी ऑक्सिजनवर लागले आहे. यावर्षी पावसाचे पाचही नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे भर पावसाळय़ातही पिकांना विहिरींचे पाणी देण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. हवामान व पाणी शेतीकरिता वेळेवर पोषक ठरत नसल्याने पिकाच्या उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. आकोट तालुक्यात पावसाने यावर्षी चांगलाच दगा दिला. प्रारंभी आला नाही. त्यानंतर धो-धो कोसळल्याने शेत जमीन वाहून नेली. काही भागातील अंकुरलेली पिके जमीनदोस्त केली. त्यामुळे आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने दुबार-तिबार पेरणी करून हतबल झालेल्या शेतकर्यांना उगविलेले पीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागात ७ जूनपासून खरीप हंगामाला प्रारंभ होऊन ८ जूनला मृग नक्षत्र हत्ती वाहन घेऊन आले. २२ जूनला आद्र्रा नक्षत्र मोरावर आले, तर ६ जुलैला पुनर्वसू नक्षत्र आले. १0 जुलैला पुष्य नक्षत्र, तर ३ ऑगस्टपासून ओषा नक्षत्र सुरू झाले आहे. आकोट तालुक्यात आतापर्यंत ३५७ मिमी पाऊस झाल्याची नोंद तहसील कार्यालयात नोंदविण्यात आली आहे. परंतु श्रावणात शेतीकरिता आवश्यक पाऊस झाला नसल्याने शेतकर्यांनी पिकाला तुषार सिंचन व ठिंबक सिंचनाच्या सहाय्याने पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मूग पेरणी केलेल्या शेतात तणच जास्त निघाल्याने शेत मोडण्यात आले. सोयाबीन विरळ निघाले आहे. परंतु सोयाबीनच्या शेतात आंतरपीक म्हणून तूर पेरणी केली असल्याने शेतकरी सोयाबीनकडे ऑक्सिजन पीक म्हणून पाहत आहेत. सध्या शेतात निंदण, डवरणी व इतर पीक वाढीकरिता पोषक कामे सुरू आहेत; परंतु पाऊस नसल्याने जमिनीतील ओल तुटली असून, सतत तापत असलेल्या रखरखत्या उन्हामुळे जमिनीला भेगा गेल्या आहेत. हाताशी असलेली उरलीसुरली पिकेसुद्धा नष्ट होण्याची शक्यता असून, उत्पन्नात घट येणार आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हातचा गेल्यातच असल्याची भीती निर्माण झाली आहे.
मूग मोडला;सोयाबीन, पर्हाटी ऑक्सिजनवर
By admin | Published: August 12, 2014 12:56 AM