अकोला : यावर्षी बियाण्यांच्या मुबलकतेसह विविध रासायनिक खतांच्या मुबलक साठय़ाचे पश्चिम विदर्भातील (वर्हाड)पाच जिल्ह्यांसाठी नियोजन करण्यात आले आहे. मागील तीन वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत सव्वा लाख मेट्रिक टन जास्त म्हणजेच ५ लाख ७९ हजार मेट्रिक टन खताचा हा साठा आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ११ हजार मेट्रिक टन खते प्रत्यक्षात उपलब्ध झाले आहेत.भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी पावसाचा अनुकूल अंदाज वर्तविल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याच पृष्ठभूमीवर कृषी विभागाने येत्या खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू केली आहे. शेतकर्यांना तंत्रज्ञान समजावून सांगण्यासाठी यांत्रिकीकरण, बीबीएफ प्लॅटर आदीद्वारे पेरणी कशी करावी व विविध शेती तंत्रज्ञान वापरू न उत्पादन वाढविण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत; तसेच शेतकर्यांना दरवर्षी भेडसावणारा बियाणे आणि रासायनिक खताचा प्रश्न यावर्षी आतापासूनच निकाली काढण्यात आला आहे.पश्चिम विदर्भातील अकोला,बुलडाणा,वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्हय़ात मागील तीन वर्षात सरासरी ४ लाख ८३ हजार मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. मागच्यावर्षी २0१६ च्या खरीप हंगामात ४ लाख ५२ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध करण्यात आले होते. यावर्षी ५ लाख ७९ हजार मेट्रिक टनाचे आवंटन करण्यात आले असून, आजमितीस १ लाख ११ हजार मेट्रिक टन विविध रासायनिक खतांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. या खताच्या साठय़ामध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्पेटसह डीएपी खताचा साठा आहे.पश्चिम विदर्भात यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र जवळपास १५ ते १७ लाख हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता असली तरी चांगल्या पावसाचा अंदाज बघता कापसाचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे.रासायनिक खताचा साठा यावर्षी मुबलक असून, बियाण्यांचीही मुबलकता आहे. त्यामुळे यावर्षी खते व बियाण्यांची अडचण भासणार नाही. पावसाचा अंदाजही अनुकूल असल्याने शेतकर्यांना अडचण भासू नये, यासाठीची तयारी कृषी विभागाने केली आहे. -एस.आर.सरदार,विभागीय संयुक्त संचालक, अमरावती.
एक लाखावर मेट्रिक टन खताचा साठा अधिक!
By admin | Published: April 30, 2017 3:14 AM