लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात अनियमितता आढळून आलेल्या जिल्हय़ातील आणखी १६ सेतू केंद्र संचालकांना गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कारणे दाखवा नोटीस (शो कॉज) बजावण्यात आली असून, खुलासा सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) आणि आपले सरकार केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात सेतू केंद्रांना येणार्या अडचणींचे निवारण आणि केंद्रांविरुद्ध तक्रारींची शहानिशा करण्यासाठी गत ५ सप्टेंबर रोजी तांत्रिक तज्ज्ञांची तपासणी पथके गठित करण्यात आली. त्यानुषंगाने पथकांनी ६ सप्टेंबर रोजी जिल्हय़ातील विविध ठिकाणी सेतू केंद्रांची तपासणी केली असता, कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात अनियमितता आढळून आलेल्या ११ सेतू केंद्र संचालकांना ६ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर ७ सप्टेंबरला आणखी जिल्ह्यातील १६ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, खुलासा सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित सेतू केंद्र संचालकांना देण्यात आला.
शेतकर्यांना मागितले पैसे; अन् असभ्य वागणूक!कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या सेतू केंद्रांच्या तपासणीत काही केंद्रांवर कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकर्यांना अवास्तव पैसे मागण्यात येत असून, असभ्य वागणूक दिली जात असल्याचे तांत्रिक तज्ज्ञांच्या पथकांना आढळून आले. त्यामध्ये अकोट येथील एका सेतू केंद्रावर शेतकर्यांना प्र त्येकी ५0 रुपयांप्रमाणे पैसे मागण्यात येत असल्याचे आढळून आले. तसेच तेल्हारा येथील एक आणि पारस येथील एका सेतू केंद्रांवर शेतकर्यांकडून पैसे घेण्यात ये त असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर शेतकर्यांनी तपासणी पथकाला सांगितले, तर बाळापूर येथील तीन सेतू केंद्रांवर शेतकर्यांना असभ्य वागणूक दिली जात असल्याचे तपासणीत आढळून आले.
ही आहेत ‘ती’ सेतू केंद्र अकोला शहरातील धम्मपाल उमाळे, बाश्रीटाकळी ये थील विवेक प्रमोद वाळके, अकोट येथील अमितकुमार ठाकूर, तेल्हारा येथील विजय पोटे, पुरुषोत्तम झोडाकार, बाळापूर येथील प्रदीप सरकटे, सचिन जाफ्राबादी, विवेक बेदरे, गणेश धानोरकार, पारस येथील राजेंद्र पा तोडे, पातूर येथील राजेश फाटकर, बाभूळगाव येथील महेश किसनराव गावंडे, सस्ती येथील अजय देशमुख, मूर्तिजापूर तालुक्यात शेलूबाजार येथील नितीन मनोहर गव्हाणे, माना येथील प्रवीण राऊत व मूर्तिजापूर येथील सौरव अरुण शिरभाते इत्यादी १६ सेतू केंद्रसंचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
१ लाख २१ हजार शेतकर्यांनी भरले कर्जमाफीचे अर्ज!कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत १ लाख ५७ हजार ९४३ शेतकर्यांच्या अर्जांची नोंदणी करण्यात आली असून, त्यापैकी १ लाख २१ हजार ७२८ शेतकर्यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यात आले, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिली.