शेगाव (बुलडाणा): पंचायती राज समितीचा (पीआरसी) धाक कमी आणि दहशतच जास्त असून, शासनाने ही समितीच रद्द करावी असे मत आ. श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी व्यक्त केले. अमरावती जिल्ह्यातील मुख्याध्यापक नकाशे यांच्या आत्महत्याप्रकरणी नियमानुसार आमदारांवर गुन्हे दाखल करायलाच हवे, अशी मागणीही त्यांनी केली. विविध मागण्यांसाठी मंगळवारी शेगाव येथून आ. श्रीकांत देशपांडे यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या पायदळ दिंडीला सुरुवात झाली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह येथील शाळेला पंचायत राज समितीच्या सदस्यांनी भेट दिल्यानंतर, या शाळेचे मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी तणावातून शाळेतच आत्महत्या केली. नकाशे हे परिस्थितीचे बळी ठरले आहेत. पंचायत राज समितीची दहशत पसरली असून, ही समितीच रद्द होणे गरजेचे आहे. इतर तक्रारींवर होणार्या कारवाईप्रमाणे या तक्रारीवरही गुन्हे दाखल होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षकांच्या पायदळ दिंडीबाबत बोलताना शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, आ. कपिल पाटील, आ. विक्रम गाळे यांनी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालणार्या विमुक्त जाती, भटक्या जमाती कनिष्ठ महाविद्यालयांवर आणि विनाअनुदानीत शाळांवर काम करणार्या प्राध्यापक आणि शिक्षकांची अवस्था दयनीय झाली असल्याचे सांगून, त्यांना तात्काळ अनुदान उपलब्ध करुन दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले. आरएसएस आणि भाजपाचा गढ असलेल्या नागपुरात गल्लोगल्लीत शिक्षक भिक मागणार आहेत. तरीही शासनाला दया आली नाही, तर सभागृह बंद पाडू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यासाठी ९ व १0 डिसेंबर रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन करणार असून शासनाने मागण्या मान्य केल्या नाही, तर बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर, विभाग अध्यक्ष सय्यद राजिक, पद्माकर इंगळे आदी उपस्थित होते.
पीआरसीची दहशतच जास्त
By admin | Published: December 02, 2015 2:41 AM