अकोला : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा महाराष्ट्र राज्य रस्ते परिहवन महामंडळाला (एसटी) ला मोठा फटका बसला आहे. गत तीन दिवसांत एसटीच्या अकोला विभागातील विविध आगारांमधून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या ३०० पेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्याने अंदाजे २४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यात ठिकठिकाणी हिंसक वळण लागले आहे. अशातच सोमवार, ४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊनच आगारांमधून बस रवाना कराव्या, अशा सूचना एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयांकडून राज्यभरातील विभाग नियंत्रक व आगार प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
या अनुषंगाने अकोला विभागातील अकोला व वाशिम जिल्ह्यातील नऊ आगारांमधून पुणे, सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव या पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यांकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे या बसफेऱ्यांमधून मिळणाऱ्या संभाव्य २४ लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागल्याचे विभागीय वाहतूक नियंत्रक पवन लाजूरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
७० हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्दशनिवार, २ सप्टेंबर रोजी अकोला विभागातील २० हजार किलोमीटरच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे ६ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. रविवार व सोमवारी अनुक्रमे २५,५०० व २५,५०० किलोमीटरच्या फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे या दोन्ही दिवशी ८ लाख ७५ हजार व ८ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याची माहिती आहे.