अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत पाच हजार महिलांनी सहभाग घेतला. त्यामुळे ‘मोर्णा माय’ स्वच्छतेसाठी शहरातील महिलाशक्ती धावल्याचा प्रत्यय आला.जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना व कर्मचारी संघटनांच्यावतीने लोकसहभागातून मोर्णा स्वच्छता मोहीम गत १३ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आली. दर शनिवारी लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेच्या पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी शहरातील गृहिणींच्यावतीने मोर्णा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ८ ते ११.३० वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत गीता नगर भागातील मोर्णा नदीकाठी महिलांची गर्दी उसळली होती.
महिला बचतगट, वस्तीस्तर संघांचा उत्स्फूर्त सहभाग !मोर्णा स्वच्छता मोहिमेत शहरातील विविध महिला बचतगट आणि वस्तीस्तर संघांच्या पदाधिकारी-सदस्य महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामध्ये मनपा क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर व त्यांच्या पत्नी मंगला घनबहाद्दूर यांच्या समवेत श्रध्दा वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष सुनंदा शिंदे, माऊली वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष अनिता मारवाल, वेणू गायधने, सार्थक वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष इंदू एललकार, एकता वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष पार्वती लहाने यांच्यासह पूजा मनवर, दुर्गा रायझडप,पूनम जाबुकस्वार, सुशीला उमाळे, रहेमुन्नीसा, पूजा बुंदेले, कांता घावडे, मंगला घावडे, माया घाडगे, कविता सोनोने, तसेच इतर महिला बचतगट व वस्तीस्तरसंघाच्या पदाधिकारी महिलांनी सहभाग घेतला.
आदित्य ठाकरेचा मोर्णाकाठी सत्कार !मोर्णा स्वच्छता मोहिमेत १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेत्या भारतीय संघातील खेळाडू आदित्य ठाकरे याच्यासह त्याच्या सहकाºयांनी सहभाग घेतला. यावेळी मोर्णा नदीकाठी आदित्य ठाकरेचा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.