अकोला : जिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने शनिवार, २० जानेवारी दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत नदीपात्राच्या दोन्ही काठावर नागरिकांची गर्दी उसळल्याने, मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी अकोलेकरांच्या एकजुटीचा पुन्हा प्रत्यय आला.अकोला शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीपात्रात जलकुंभी मोठ्या प्रमाणात वाढली असून, घाण कचरा साचला आहे. शहरातील सांडपाणी नदीत जात असल्याने, मोर्णा नदीत अस्वच्छता पसरली आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व शहरातील विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, कर्मचारी संघटनांसह लोकसहभागातून गत १३ जानेवारी रोजी मोर्णा नदी स्वच्छता मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेला मिळालेला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता, मोर्णा नदी स्वच्छ होईपर्यंत स्वच्छता मोहीम सुरुच राहणार असून, दर शनिवारी मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जाहीर केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासन, शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना व कर्मचारी संघटनांच्यावतीने दुसºया टप्प्यात २० जानेवारी रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत लक्झरी बस स्टँन्डमागील परिसरात मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत मोर्णा नदीतील जलकुंभी, कचरा आणि गाळ काढण्यात आला.
लोकप्रतिनिधी, अधिकाºयांसह नागरिकांचा सहभाग जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आमदार हरिष पिंपळे, महापौर विजय अग्रवाल, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार राजेश्वर हांडे, नगरसेवक हरिष आलिमचंदाणी, उषा विरक, किरण बोराखडे, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष भडांगे, श्रीराम हेल्थ अॅन्ड फिटनेस सेंटरचे विक्रम उर्फ छोटू गावंडे, संत निरंकारी सेवा मंडळाचे क्षेत्रीय संचालक शामलाल निरंकारी, संचालिका गीता कटारिया, सामाजिक कार्यकर्ता पराग गवई, ‘एनएसएस ‘चे जिल्हा समन्वयक प्रा.तिडके, डॉ.एम.आर. इंगळे, सीताबाई कला महाविद्यालयाचे डॉ.प्रसन्नजीत गवई यांच्यासह महसूल मंडळ अधिकारी, तलाठी संघटना, महिला बचत गट,स्वयंसेवी संस्था व विविध सामाजिक संघटना आणि नागरिक सहभागी झाले होते. लोकसहभागातून दुसºया टप्प्यात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने, मोर्णा नदी स्वच्छतेसाठी पुन्हा अकोलेकरांच्या एकजुटीचा प्रत्यय आला.