अकोला: मोर्णा महोत्सव फाउंडेशन नामक संस्थेच्या माध्यमातून मोर्णा महोत्सव आयोजित करण्यात आला असला तरी, याचे खरे सूत्रधार हे जिल्हा प्रशासनच होते. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातच हा महोत्सव झाल्याची बाब समोर आली आहे. या महोत्सवाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात आला. त्यासाठी मोर्णा महोत्सव फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाचे आर्थिक पाठबळ मिळाले. फाउंडेशनचे कोषाध्यक्ष मोर्णा महोत्सवाच्या आर्थिक व्यवहारांविषयी अनभिज्ञ आहेत, हे विशेष.मोर्णा स्वच्छता अभियान यशस्वी झाल्यानंतर काही लोकांच्या डोक्यात मोर्णा महोत्सव फाउंडेशन नावाचे दुकान सुरू करण्याची कल्पना आली. जिल्हाधिकाºयांसमोर हा विषय मांडल्यानंतर त्यांनाही ही कल्पना आवडल्याने, मोर्णा महोत्सव फाउंडेशन नावाने नोंदणीकृत संस्थाच स्थापन करण्याचे ठरले. या संस्थेमध्ये अकोल्यातील कोणत्या व्यक्तींना घ्यायचे, याचेसुद्धा नियोजन झाले. पदाधिकारी ठरल्यानंतर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाºयांच्या पुढाकारातून मोर्णा महोत्सव फाउंडेशनची अधिकृत नोंदणी करण्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे अर्ज करण्यात आल्यानंतर एका दिवसातच या संस्थेची नोंदणी झाली आणि मोर्णा महोत्सवाच्या आयोजनासाठी अधिकृत वर्गणी गोळा करण्याची परवानगीच फाउंडेशनच्या नावाखाली जिल्हा प्रशासन व काही पदाधिकाºयांना मिळाली. मोर्णा महोत्सव फाउंडेशनचे पदाधिकारी आणि ही संस्था केवळ नावालाच आहे. त्यांच्या नावाखाली दुकानदारी करून कोट्यवधी रुपयांचा निधी उभा करण्यात आला; परंतु फाउंडेशनच्या पदाधिकाºयांनाच किती निधी जमा झाला, याची निश्चित माहिती नाही. यावरून जिल्हा प्रशासनाचे मोर्णा महोत्सव आयोजनामागील अर्थपूर्ण गौडबंगाल लक्षात येते. मोर्णा महोत्सव फाउंडेशन स्थापनेमागे सांस्कृतिक महोत्सव, मोर्णा नदी स्वच्छता अभियान, मोर्णा नदीचे सौंदर्यीकरण, ग्रामीण विकास योजना, मनपा, नपाच्या योजनांची अंमलबजावणी, जलसाक्षरता, जलसंधारण, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांना मदत, वृक्षारोपण, वृक्ष संगोपनासह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रम, पर्यटन महोत्सव, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, पुरस्कार वितरण यांसह इतर उद्देश निश्चित करण्यात आले; परंतु ठरविलेल्या उद्देशांनाच हरताळ फासण्याचा प्रयत्न पहिल्याच मोर्णा महोत्सवात जिल्हा प्रशासनाने केला. मोर्णा महोत्सवातून अकोलेकरांचे हित तर साधल्या गेलेच नाही, उलट मोर्णा महोत्सव फाउंडेशनच्या नावाने जिल्हा प्रशासन आणि फाउंडेशनच्या पदाधिकाºयांनी स्वहित मात्र साधले, असाच संदेश यातून गेला आहे. (प्रतिनिधी)
येथून चालला कारभार!मोर्णा महोत्सव फाउंडेशनची स्थापना झाली; परंतु या स्थापनेमध्ये पुढाकार असलेले डॉ. गजानन नारे हे फाउंडेशनमध्ये पदाधिकारी नाहीत; परंतु संस्था नोंदणी करताना, संस्थेचा पत्ता मात्र प्रभात किड्स, तोष्णीवाल ले-आउट हा देण्यात आला. मोर्णा महोत्सव आयोजनाचा सर्व कारभारसुद्धा येथूनच चालला. फाउंडेशनच्या बैठका, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सर्व काही याच कार्यालयातून ठरले.