संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
पातूर : तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून, तलाव, प्रकल्प तुडुंब भरले आहे. तालुक्यात जून-सप्टेंबरदरम्यान ९१ टक्के पाऊस पडला आहे. तालुक्यातील मोर्णा-निर्गुणा दोन मध्यम प्रकल्पांसह सात लघुपाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. पावसाची हजेरी कायम असल्याने सोयाबीन, कपाशी, तूर आदी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
तालुक्यातील मोर्णा प्रकल्प शंभर टक्के भरला असून, गेल्या दोन दिवसांपासून ओव्हर फ्लो सुरू झाला आहे. यापूर्वीच तालुक्यातील दुसरा निर्गुणा प्रकल्पाचाही विसर्ग सुरू झाला आहे. त्याबरोबरच तालुक्यातील तुळजापूर लघुपाटबंधारे प्रकल्प ७१.१२ टक्के भरला असून, उर्वरित गावंडगाव, सावरगाव, पातूर तलाव, विश्वामित्री, झरंडी आणि हिवरा सदर प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत.
पातूर तालुक्यात जून-सप्टेंबरदरम्यान आतापर्यंत ८०१.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत सरासरी १६ टक्के कमी असून, या वर्षीचा तब्बल ९१ टक्के पाऊस झाला आहे. गत दोन दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. तालुक्यात सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.
-----------------------------
रब्बीची चिंता मिटली, मात्र खरीप धोक्यात!
तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने प्रकल्प, तलाव शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात पाणी मिळण्याची आशा वाढल्याने शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची चिंता मिटली आहे; मात्र सततचा पाऊस सुरू असल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात सापडले आहेत. अवघ्या काही दिवसावर सोयाबीन सोंगणी आली असताना पाऊस सुरू असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तालुक्यातील उडीद, मूग हातचे गेले आहेत. त्याबरोबरच कपाशीवरही रोगराई आली आहे.
--------
तालुक्यात संततधार पाऊस असल्याने सोयाबीनचे पीक संकटात सापडले आहे. गतवर्षीही खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले होते. यंदाही अशीच स्थिती असल्याने चिंता वाढली आहे.
संतोष घुगे, पास्टूल.
-------------
गतवर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदाही फुलगळ, पातेगळ व बोंडसळ झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
- स्वप्निल कोकाटे, शिर्ला.
250921\screenshot_20210925_154644.jpg
मोर्णा ओव्हरफ्लो