अकोला: मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला आता लोकचळवळीचे स्वरुप मिळाले असून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजही हजारो अकोलेकर मोर्णाच्या स्वच्छतेसाठी एकजुटीने नदीकाठी आले होते. आपली मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे, असा ध्यास घेऊन हजारो लोकांनी आज स्वच्छतेच्या या महायज्ञेत आपला सहभाग नोंदवला.
आज सकाळी ठिक 8.00 वाजता मोर्णाच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. गीतानगर भागाला लागून असणाऱ्या मोर्णाच्या पूर्व व पश्चिम भागात आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी जेसीबीव्दारे काढण्यात आलेला कचरा लोकांनी वाहनांमध्ये भरुन दिला. तसेच नदीपात्रात उतरुन शेकडो लोकांनी सांघिकरित्या कचरा बाहेर काढला. या मोहिमेत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, त्यांच्या पत्नी तथा वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर, नगरसेवक हरिष अलीमचंदानी, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप पाटील, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर, तहसिलदार राजेश्वर हांडे, राहूल तायडे, एसटीचे विभागीय व्यवस्थापक श्री. पलंगे, यांच्यासह विदयार्थी, शिक्षक, व्यापारी, बचतगटाच्या महिला, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी/कर्मचारी, पोलीस, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक, वयोवृध्द नागरिक, विदयार्थी आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. केवळ अकोला शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातून अनेकजण स्वच्छतेसाठी पुढे आले होते. सुमारे दोन ते अडीच हजार लोकांनी मोर्णाची स्वच्छता केली.
नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छते अंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन आणि मनपा व पोलीस प्रशासनाने केले होते. त्यामुळे सहभागी सर्वांनीच कुठलीही भीती न बाळगता स्वयंस्फुर्तीने नदी काठावरील कचरा हिरीरीने ट्रॅक्टर व घंटागाडीत टाकला. मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे या भावनेतून सर्वजण मन लावून काम करताना दिसत होते. विशेष म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना न घडता ही मोहिम खूपच शिस्तबध्दपणे व शांततेने पार पडली. मोहिमेकरीता आवश्यक असणारी साधने व साहित्य मनपाकडून पुरविण्यात आले. यावेळी सर्पमित्र पथक, वैदयकीय सहायता पथक, पाणी व्यवस्थापन, साहित्य पुरवठा, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक नदीकाठी हजर होते. ठेकेदार दीपक कारगल यांनी स्वच्छतेसाठी पोकलेनची सेवा मोफत उपलब्ध करुन दिली.
मोहिमेत मूर्तिजापूर येथील गाडगे बाबा स्वच्छता मंडळ स्वच्छता अभियान पथक, क्रीडा भारती, तसेच हॉली क्रॉस शाळा, आरडीजी महिला महाविदयालय, शिवाजी कॉलेज, सीताबाई आर्टस महाविदयालय एलआरटी महाविदयालयाचे एनसीसीचे विदयार्थी, स्वावलंबी वस्तीस्तर संघ, शौर्य संस्था, आत्मा, व्यापारी, एसटीचे कर्मचारी, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, शिवाजी विदयालयाचे विदयार्थी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य समितीचे सदस्य, पिंजर येथील संत गाडगेबाबा आपतकालीन शोध बचाव पथक, भाग्योदय फांउडेशन, गुरुदेव सेवामंडळ, महानगर पालिका शिक्षक संघटना, शिवशक्ती महिला बचतगट, दादाजी महिला बचत गट, संतोषीमाता महिला बचत गटाचे सदस्य, पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी, आणि मनपाचे सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.