अकोला : मोठ्या प्रमाणात जलकुंभी फोफावल्याने गत दोन वर्षांपासून जलप्रवाह अवरुद्ध झालेल्या मोर्णा नदीचा श्वास अखेर गुरुवारी आलेल्या पुरामुळे मोकळा झाला. पुराने जलकुंभी वाहून गेल्यामुळे नदी पूर्वीसारखी खळखळून वाहात आहे. मानवी यंत्रणा हतबल झाल्यानंतर निसर्गाने मोर्णा नदीची जलकुंभीच्या फासातून मुक्तता केली आहे. ( Finally the Morna River took a deep breath)
जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली मोर्णा नदी ही अकोला शहराच्या मध्य भागातून वाहाते. कधीकाळी स्वच्छ व निर्मळ पाणी असलेल्या मोर्णा नदीला शहरातील सांडपाण्यामुळे चक्क गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एवढेच नव्हे, तर नदीपात्रात जलकुंभीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. जलकुंभी व नदीपात्रात साचलेल्या कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह अवरुद्ध झाला होता. बुधवारी रात्री अकोल्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानंतर गुरुवारी सकाळी मोर्णा नदीला महापूर आला. गत १५ वर्षात पहिल्यांदाचा नदीला एवढा मोठा पूर आल्यामुळे नदीपात्रातील जलकुंभी वाहून गेली आहे. आता नदीपात्र मोकळे झाले असून, पाणी खळखळून वाहात आहे.
शहराचे वैभव असलेल्या नदीच्या स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन वेळावेळी स्वच्छता मोहीम राबविली तर पुन्हा जलकुंभी फोफावणार नाही, अशा भावना अकोलेकरांच्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी राबविली होती माेहीम
तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मोर्णा नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जानेवारी २०१८मध्ये मोर्णा स्वच्छता मिशन सुरू केले होते. प्रशासन व लोकसहभागातून सुरू झालेल्या या मोहिमेला त्यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.