- सचिन राऊत
अकोला : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील वाहतूक शाखेने १ जानेवारी ते २५ जुलै २०२० या कालावधीत केलेल्या कारवायांमध्ये अकोला वाहतूक शाखेच्या कारवाया सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. अकोला वाहतूक शाखेने या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४५ हजार वाहनांवर कारवाई करून अमरावती विभागातून अव्वल कामगिरी केली आहे.अमरावती विभागातील वाहतूक शाखेने १ जानेवारी ते २५ जुलैपर्यंतच्या केलेल्या दंडात्मक कारवाया पाहता अकोला शहर वाहतूक शाखेने ४५ हजार १५६, बुलडाणा १६ हजार ७१०, वाशिम १९ हजार ७४१, यवतमाळ ३० हजार ५५२, अमरावती ३८ हजार ७३६ अशा दंडात्मक कारवाया केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. अकोला वगळता इतर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा वाहतूक शाखा कार्यान्वित आहे. म्हणजेच त्यांचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण जिल्हा असते; मात्र अकोला येथे शहर वाहतूक शाखा असल्याने त्यांनी सदर कारवाया शहरातच केलेल्या आहेत, हे विशेष. या कारवाया तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर आणि पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली. ई चालानसाठी उपलब्ध मशीनमागील दीड वर्षापासून दंडात्मक कारवाया ई चालान मशीनद्वारे करण्यात येत आहेत. त्यानुसार अकोला शहर वाहतूक विभागाकडे ई चालान मशीनची संख्या २६ आहे. बुलडाणा जिल्हा वाहतूक शाखेकडे ९, वाशिम जिल्हा वाहतूक शाखेकडे ७, यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेकडे ५०, अमरावती जिल्हा वाहतूक शाखेकडे २८ ई चालान मशीन उपलब्ध आहेत. नजर आकडेवारीवरअकोला शहर वाहतूक शाखेने ४५ हजार १५६ कारवाया करून विभागात सर्वाधिक कारवाई केल्या आहेत. त्याखाली अमरावती जिल्ह्यात ३८ हजार ७३६ कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यानंतर यवतमाळ पोलिसांनी ३० हजार ५५२ कारवाई केल्या आहेत. बुलडाणा जिल्हा पोलिसांनी १६ हजार ७१० तर वाशिम पोलिसांनी १९ हजार ७४१ कारवाई केल्या आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शहर वाहतूक विभागाने वेळोवेळी धडक मोहिमा राबवून नियमांचा भंग करणारी एकूण २ हजार ८६० वाहने जप्त केली होती व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून वाहन चालविल्याने शहर वाहतूक शाखेने एकूण ५८ गुन्हे शहराच्या विविध पोलीस स्टेशनला दाखल करीत १ हजार ४५ वाहने जप्त करण्यात आली होती.