अकोला : विस्कळीत झालेली व काही ठिकाणी पूर्णत: बंद पडलेली लँडलाइन सेवा सुरळीत करण्यासाठी बीएसएनएलच्या विभागीय कार्यालयात विनंतीअर्जांची चळत लागलेली असताना गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे शहरातील बहुतांश भागातील ही सेवा पूर्णत: ठप्प पडली आहे. बीएसएनएलची लँडलाइन सेवा बंद पडणे ही बाब अकोलेकरांसाठी नित्याची झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या खोदकामांमुळे तसेच गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे शहर व औद्योगीक परिसरातील लँडलाइन सेवा पूर्णत: प्रभावित झाली आहे. बीएसएनएल लँडलाइनच जबरदस्त अशी ग्वाही देत जाहीरातींच्या माध्यमातून ग्राहकांना आवाहन करणार्या बीएसएनएलचे ग्राहक नकळत तुटत चालले असल्याचे दिसून येत आहे. शहरातील लाखो ग्राहक विविध प्लॅन्सच्या माध्यमातून बीएसएनएलच्या लँडलाइनच्या सेवेचा लाभ घेत आहेत, मात्र विरोधाभास असा की, विविध प्लॅनचा लाभ घेणारे अकोलेकर ग्राहक वारंवार विस्कळीत होत असलेल्या या सेवेमुळे त्रस्त झाले आहेत. विनंती अर्ज सादर करूनदेखील महिनोन्महिने ही स्थिती कायम राहत असल्याने अनेक ग्राहकांनी विभागीय दूरसंचार अधिकार्यांकडे ही सेवा पूर्णत: बंद करण्यासंदर्भात अर्ज सादर केले असल्याची माहिती आहे. गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे आणि शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या खोदकामांमुळे बहुतांश भागातील लँडलाइन सेवा ठप्प पडली आहे. याच माध्यमातून ब्रॉडबँडच्या सेवेचा लाभ घेणार्या ग्राहकांना वारंवार खंडित होणार्या या सेवेमुळे इंटरनेसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत बीएसएनएलच्या अधिकार्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, ते स्वत: या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले.
बहुतांश भागातील दूरध्वनी सेवा विस्कळीत
By admin | Published: March 19, 2015 1:32 AM