बार्शीटाकळी : तालुक्यातील दगडपारवा धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात आई व दोन मुली मायलेकींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सरिता सुरेश घोगरे (वय ४०, रा. दगडपारवा)असे मृत महिलेचे नाव आहे. तर मोठ्या मुलीचं नाव अंजली घोगरे (१६), तर लहान मुलीचे नाव वैशाली घोगरे (१४) आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथील धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहते. या परिसरात घोगरे कुटुंबातील दोन मुली आणि त्यांची आई हे आपल्या म्हशीचा शोध घेण्यासाठी रविवारी दुपारी तीन वाजतापासून घरून निघाल्या होत्या. मात्र रात्री उशीर झाल्यानंतरही त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबातील प्रमुख असलेले सुरेश घोगरे यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र कुठलाही सुगावा त्यांच्या हाती लागला नाही. अखेर त्यांनी या संदर्भात बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. धरणाच्या सांडवाच्या पाण्यात आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावकऱ्यांना मायलेकींचे मृतदेह आढळून आले. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी आले आणि बचाव पथकासह गावकऱ्यांच्या मदतीने मायलेकींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
सुरवातीला मोठी मुलगी अंजली ही पाण्यात बुडाली आणि तिला वाचवण्यासाठी गेलेली आई आणि लहान बहिणही पाण्यात बुडाली. यामुळे तिघींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे.