अकोला: नवजात बालकास सोडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बाळंतीणला अडविणाऱ्या निवासी महिला डॉक्टरला बाळंतीणने मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात घडला. याप्रकरणी डॉक्टरने कोतवाली पोलिसांत तक्रार दिली.निवासी डॉक्टर काजल संघवी यांच्या तक्रारीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक दोनमध्ये हरिहरपेठ निवासी एक महिला प्रसूतीसाठी दाखल होती. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही बाळंतीण बाळाला सोडून गेली होती. यासंदर्भात डॉक्टरांनी सर्वोपचार परिसरातील पोलीस चौकीला कळविले होते. कालांतराने बाळंतीण परत बाळाजवळ आल्याची माहिती डॉक्टरांना मिळाली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास निवासी डॉक्टर संघवी बाळंतीणला बघण्यास गेल्या असता, बाळंतीणने डॉ. संघवी यांना मारहाण केल्याची घटना घडली. याप्रसंगी वॉर्डात उपस्थित महिला सुरक्षारक्षकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. डॉक्टरांनी मदतीची हाक मारल्यानंतर सुरक्षारक्षक मदतीला धावून आले. यानंतर रात्री डॉक्टरांनी सर्वोपचारमधील पोलीस चौकीत बाळंतीणविरुद्ध तक्रार दिली.ऐनवेळी मदतीला कोणीच नाही!डॉक्टरांना झालेल्या मारहाणीबाबत निवासी डॉक्टरांनी पोलिसांना कळविले; परंतु सुरुवातीला पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे. सर्वोपचारमध्ये स्वतंत्रपणे कार्यरत सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर हा प्रकार घडत होता. अशा परिस्थितीत केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असताना प्रशासनाचीही उदासीन भूमिका दिसून आल्याचे निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे.