पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील उमेश रामदास गवई (३५) याला मागील वर्षीपासून किडनीच्या आजाराने ग्रासले आहे. अकोला येथे प्राथमिक उपचार केले. परंतु आराम पडला नाही. त्याचे डायलिसिस करून पाहिले. परंतु त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याने, किडनीरोग तज्ज्ञांनी त्याला किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. यामुळे उमेश गवई यांच्या कुुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. किडनी देण्यासाठी वणवण फिरूनही कोणी किडनी दान दिली नाही. अखेर पोटच्या मुलाला किडनी देण्यासाठी आईच धावून आली. आता किडनी तर मिळाली. घरची परिस्थिती नाजूक. किडनी प्रत्यारोपणासाठी लाखो रुपये कुठून आणावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. किडनी प्रत्यारोपणासाठी लागणारा खर्च या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा आहे. जवळ होता नव्हता, सर्व पैसा प्राथमिक उपचार, औषध व डायलिसिसमध्ये खर्च झाला. किडनी प्रत्यारोपणासाठी गवई कुटुंबाला १५ ते १६ लाख रुपयांची गरज आहे. परंतु एवढा पैसा कोणाला मागावा? असा प्रश्न या कुटुंबासमोर उभा आहे. समाजातील दानदाते, सहृदयी लोकांनी यासाठी पुढे यावे आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या उमेश गवई याचे प्राण वाचवावे, अशी आर्त साद एका मातेने घातली आहे.
फोटो:
शेवटी माणुसकीशिवाय...
समाजातील दानशूर, सहृदयी लोकांनी मदतीसाठी पुढे यावे. आपल्या मदतीतून कोणाचे प्राण वाचत असतील तर दुसरे पुण्य कोणते? माणुसकी, संवेदना...हीच खरी नाती आहेत. स्वतःची सावलीसुद्धा अंधारात साथ सोडत असते! कितीही मोठा झाला माणूस तरीही, शेवटी माणुसकीशिवाय शिल्लक काहीच उरत नसते !! दोन सेकंदात आता हृदय जग सोडणार होतं, तेवढ्यात एका हाताने मला पुन्हा सावरल होतं...तसंच सहृदयी समाजाने उमेश व उमेशच्या कुटुंबालाही सावरावं. त्याचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा खाते क्रमांक ३५२४७८७१७९५ यावर मदत करावी किंवा ९०७५४१५००३ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.