अकोला: पारद येथील रहिवासी असलेले गौरव सुरेश तायडे (३२), पत्नी प्रिया गौरव तायडे (२८) व मुलगी आराध्या (२) हे तिघे नदीपलीकडे असलेल्या दर्यापूर तालुक्यातील धामोडी या गावी मावशीच्या अंत्यविधीला गेले होते. अंत्यविधी आटोपून दुसऱ्या दिवशी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान परत येत असताना बॅरेजजवळ आल्यानंतर गेट बंद असल्याने चौकीदार संजय भाऊराव गवई यांना चावी मागितली.
दरम्यान मुलगी गेटच्या जवळ गेली तेव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आई प्रिया व वडील गौरव यांनी पाण्यात उडी घेतली. यावेळी चौकीदार संजय गवई यांनी आरडाओरडा केला. बाजूला असलेले काही युवक धावून आले व त्यांनी पाण्यात दोर फेकला. या दरम्यान माय-लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, परंतु वडील गौरव यांनी दोर पकडल्याने त्यांचे प्राण वाचले.
‘तो’ भाग दर्यापूर पोलिसांच्या हद्दीत
घुंगशी बॅरेज पारद येथे असले तरी घटनास्थळाचा भाग दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस व जिल्हा शोध बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शोध पथकाने शोधमोहीम सुरू करताच प्रथम आई (प्रिया) हिचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर चिमुकली आराध्या हिचा मृतदेह सापडला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी दर्यापूर येथे पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास ठाणेदार आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस करीत आहेत.
घटनेबाबत चौकशी व्हावी; प्रियाच्या वडिलांची तक्रार
मृत प्रिया गौरव तायडे व तिची मुलगी आराध्या यांच्या मृत्यूबद्दल प्रियाचे वडील विठ्ठल गोविंदराव फुंडकर (रा. हनवतखेडा) यांनी आक्षेप घेत दोघींचा मृत्यू नेमका पाय घसरून किंवा उडी घेतली की त्यांना पाण्यात ढकलून देण्यात आले, अशी शंका उपस्थित करून या आशयाची तक्रार दर्यापूर पोलिसात दाखल केली.