अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रस्तावित मदर मिल्क बँकेचे काम गत एक ते दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. आवश्यक सुविधांअभावी येथे आतापर्यंत प्रसूत मातांचे दूध संकलन करणे आणि आवश्यकतेनुसार गरजू शिशुंना दूध उपलब्ध करून दिले जाते. मात्र, आता ही मदर मिल्क बँक पूर्णत्वास येणार असून, येथे संकलित दुधावर पास्चराइज्डची प्रक्रियाही केली जाणार आहे. त्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्याची माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे. सर्वोपचार रुग्णालयानंतर जिल्हा स्त्री रुग्णालयाला मदर मिल्क बँकेची मान्यता मिळाली असली, तरी आतापर्यंत या ठिकाणी प्रसूत मातांचे दूध संकलित करून ते साठवून ठेवण्यात येत होते. नंतर आवश्यकतेनुसार गरजू शिशुंना हे दुध उपलब्ध करून दिल्या जात होते. मात्र, आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने अद्यापही येथे संकलित दूध पास्चराइज्ड केले जात नाही. त्यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयातील मदर मिल्क बँक पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाही. मात्र, रुग्णालय प्रशासनाने यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती असून, त्यासाठी आवश्यक वॉर्डाच्या नूतनीकरणाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. यानंतर या ठिकाणी आवश्यक साधनांची उपलब्धता करून संकलित दुधावर प्रक्रिया केली जाणार असल्याचीही माहिती जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
आईचे दूध साठवण्याची व्यवस्था असल्याने गरजू नवजात शिशुंना आईचे दूध उपलब्ध करून देणे शक्य झाले. मदर मिल्क बँक पूर्णपणे कार्यान्वित करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मिल्क बँक पूर्ण क्षमतेने ही सेवा देणे शक्य होईल. रक्तदानाप्रमाणेच आईचे दूध दान करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. आईला कुठलेच इन्फेक्शन नको आदी चाचण्या केल्यानंतरच दूध दान करणे शक्य आहे.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला