जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सर्वोपचार रुग्णालय कोविडसाठी राखीव केल्याने येथील मदर मिल्क बँकही प्रभावित झाली. कोविड पॉझिटिव्ह मातांव्यतिरिक्त येथे इतर गर्भवतींची प्रसूती न झाल्याने आईच्या दुधाचे संकलनही बंद झाले. दरम्यान, सर्वसाधारण गर्भवतींच्या सर्वच प्रसूती जिल्हा स्त्री रुग्णालयात संदर्भीत करण्यात आल्या. कमी मनुष्यबळ असल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयावर प्रसूतीचा भार वाढत गेला. ही स्थिती असताना काही नवजात शिशूंना आईचे दूध पुरविण्याचीही मोठी जबाबदारी जिल्हा स्त्री रुग्णालयावर आली. अशा परिस्थितीत रुग्णालयाने महत्त्वाची भूमिका बजावत नवजात शिशूंना दिले आईचे दूध उपलब्ध करून दिले.
मदर मिल्क बँकेची प्रतीक्षा कायम
सर्वोपचार रुग्णालयाप्रमाणेच जिल्हा स्त्री रुग्णालयातही मदर मिल्क बँक प्रस्तावित आहे. त्यासाठी येथे संकलित दूध साठवणुकीची व्यवस्थाही करून दिली आहे; मात्र अद्यापही दूध पाश्वराइज्डसाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध झाली नाही. पुढील सहा महिन्यात ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
आईचे दूध साठवण्याची व्यवस्था असल्याने गरजू नवजात शिशूंना आईचे दूध उपलब्ध करून देणे शक्य झाले. मदर मिल्क बँक पूर्णपणे कार्यान्वित झाल्यास पूर्ण क्षमतेने ही सेवा देणे शक्य होईल. रक्तदानाप्रमाणेच आईचे दूध दान करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. आईला कुठलेच इन्फेक्शन नको आदी चाचण्या केल्यानंतरच दूध दान करणे शक्य आहे.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला