संताेष येलकर
अकोला: प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून ‘मातृ वंदना’ सप्ताह राबविण्यात येत असून, त्यामध्ये योजनेसंदर्भात महिलांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या योजनेत शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळता इतर सर्व मातांना पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यांत पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत.
शासनामार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २०१७ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शासकीय सेवेत नसलेल्या मातांना पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यांत पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यानुषंगाने योजनेसंदर्भात महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत ‘मातृ वंदना’ सप्ताह राबविण्यात येत आहे.
तीन टप्प्यांत मिळणार पैसे
‘मातृ वंदना’ योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी मातांना तीन टप्प्यांत पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात नोंंदणी केलेल्या गरोदर मातांना एक हजार रुपये, सहा महिन्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात प्रसूतीनंतर व जन्मलेल्या बाळाच्या लसीकरणाचे तीन डोस झाल्यानंतर दोन हजार रुपयांची रक्कम मातांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
पहिला टप्पा : १०००
दुसरा टप्पा : २०००
तिसरा टप्पा : २०००
.......................................................
पात्रतेचे निकष काय?
मातृ वंदना योजनेत पाच हजार रुपयांच्या लाभासाठी मातेचे पहिले अपत्य असावे आणि लाभार्थी माता शासकीय सेवेत नसावी. तसेच लाभार्थी मातेने गाव पातळीवर आशा स्वयंसेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
........................
लाभासाठी कोठे
करायचा संपर्क ?
‘मातृ वंदना’ योजनेच्या लाभासाठी नोंदणी केलेल्या मातांनी पहिल्या टप्प्याच्या रकमेसाठी नमुना अ, दुसऱ्या टप्प्याच्या रकमेसाठी नमुना ब आणि तिसऱ्या टप्प्यातील रकमेच्या लाभासाठी नमुना क अर्ज भरण्यासाठी गावातील संबंधित आशा स्वयंसेविकाकडे संपर्क साधावा. आशा स्वयंसेविकांकडून संबंधित मातांचे अर्ज भरून घेण्यात येतील व ते अर्ज संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येतील. त्यानंतर टप्पानिहाय रक्कम मातांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
......................................
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी मातांना पाच हजार रुपये तीन टप्प्यात देण्यात येणार आहेत. त्यासाठी नोंदणी केलेल्या गरोदर मातांनी परिपूर्ण माहितीसह आशा स्वयंसेविकाकडे अर्ज भरून देणे आवश्यक आहे. आशा स्वयंसेविकांनी अर्ज भरून घेतल्यानंतर योजनेच्या लाभाची टप्पानिहाय रक्कम मातांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. या योजनेसंदर्भात महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात ‘मातृ वंदना ’ सप्ताह राबविण्यात येत आहे.
डाॅ. सुरेश आसोले
जिल्हा आरोग्य अधिकारी