लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : माउंट कारमेल स्कूलमध्ये दुसर्या वर्गात शिक्षण घेत असलेला एक विद्यार्थी बुधवारी सकाळी शाळेत असताना तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला इजा असल्याने एका मोठय़ा खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर प्रकरण चिघळणार असल्याने, तसेच शाळेच्या विरोधात काही लोकांनी नारेबाजी केल्याने या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माउंट कारमेल शाळेमध्ये मो. इझहान हा दुसर्या वर्गात शिक्षण घेत आहे. बुधवारी सकाळी जेवणाची सुटी झाल्यानंतर विद्यार्थी बाहेर खेळत असताना मो. इझहानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्यात काठी मारल्याचे किंवा त्याच्या पायात पाय टाकून त्याला खाली पाडल्याने तो गंभीर जखमी झाल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. इझहान जमिनीवर कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यानंतर येथील शिक्षकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल न करता पालकांना माहिती दिली. पालकांना येण्यास वेळ झाल्याने विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर झाली. पालक शाळेत आल्यानंतर त्यांनी मुलास घेऊन रुग्णालय गाठेपर्यंत विद्यार्थी बेशुद्धावस्थेत गेला होता. माउंट कारमेल शाळा व्यवस्थापनाच्या दिरंगाईमुळे एका विद्यार्थ्याचा जीव धोक्यात आल्याचा आरोप करीत काही नागरिकांनी या परिसरात गुरुवारी सकाळी नारेबाजी केली. या प्रकाराची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर रामदास पेठ पोलिसांनी विद्यार्थी व शिक्षकांचे बयान नोंदविले असून, हा प्रकार नेमका कसा घडला, याचा शोध घेण्यात येत आहे.
सदर विद्यार्थी जेवणाच्या सुटीमध्ये खेळत असताना अचानक कोसळला, त्याला शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी किवा अन्य कुणीही मारहाण केली नाही. या विद्यार्थ्याच्या डोक्याला नेमकी कशामुळे इजा झाली याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. शाळा प्रशासन सर्व सहकार्य करीत आहे.- फादर जॉर्ज मॅथ्यू, माउंट कारमेल स्कूल
मुलगा गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सदर प्रकरणाची तक्रार प्राप्त नाही. शिक्षक व विद्यार्थ्यांचे बयान नोंदविण्यात येत आहे. या संदर्भात मुलाच्या आई-वडिलांनीही कुणाची तक्रार केली नाही. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.- शैलेश सपकाळ, ठाणेदार, रामदास पेठ पोलीस स्टेशन