लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील टिळक मार्गावर सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. एकीकडे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना हजारो लीटर पाणी वाहून गेल्याचा निषेध करण्यासाठी तसेच रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या मागणीसाठी सागर भारुका यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी रविवारी खोदलेल्या रस्त्यात साचलेल्या पाण्यात बसून अनोखे आंदोलन केले. शहरात मंजूर झालेल्या आठ सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांपैकी सध्या टिळक मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी सिटी कोतवाली चौक ते जुना कपडा बाजारपर्यंतच्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. सदर खोदकाम सुरू असताना गत चार दिवसांपूर्वी जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लीटर पाणी वाहून गेले. फुटलेल्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच रस्त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्यामुळे या रस्त्यावरील व्यावसायिकांचा व्यवसाय प्रभावित होत आहे. याबाबत प्रशासनाकडे विनंती-अर्ज व तक्रारी केल्यानंतरही त्याची दखल घेतल्या गेली नाही. अखेर शिवसेनेचे पदाधिकारी सागर भारुका व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी खोदून ठेवलेल्या रस्त्यात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
शिवसैनिकांचे पाण्यात बसून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2017 1:10 AM