युवक काँग्रेसच्या वतीने लोहारी-मुंडगाव व वनीवारुळा-मुंडगाव रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी करीत सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देण्यात आले होते. लोहारी- मुंडगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे; परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग अकोट व तेल्हारा या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रस्ता खड्डामय झाला असून, रस्त्यावर वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना वाढल्या असून, वाहनचालकांना हाडांचे आजार जडले आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम सात दिवसांत न झाल्यास अकोट युवक काँग्रेसच्या वतीने रस्त्याच्या खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष तथा अकोला लोकसभा युवक काँग्रेसचे माजी निरीक्षक मिलिंद नितोने यांनी दिला होता. त्यानुसार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश गंणगणे यांच्या मार्गदर्शनात, तर लोकसभा युवक काँग्रेसचे माजी निरीक्षक मिलिंद नितोने यांच्या नेतृत्वात मंगळवारी मुंडगाव-लोहारी रस्त्यावर एकदिवसीय बैठा आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात यांचा सहभाग
आंदोलन करतेवेळी काँग्रेस ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रोशन चिंचोलकार, काँग्रेस ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नीलेश आग्रे, काँग्रेस ब्रिगेड तालुका सचिव दीपक मोहिते, काँग्रेस ब्रिगेडचे शहराध्यक्ष विवेक सरदार, दीपक इंगळे, विनोद मोहिते, अजय आग्रे, राजेश डोंगरे, शिवराम डिक्कर, अरुण महिसणे, शरद ठाकरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
-----------------
मुंडगाव-लोहारी, मुंडगाव-वणी वारुळा रस्त्याचे डांबरीकरण लवकर व्हावे, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यानंतरही रस्त्याचे काम न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासून आंदोलन करणार आहोत.
- मिलिंद नितोने, युवक काँग्रेस
-------------------
लोहारी-मुंडगाव हा रस्ता जिप बांधकाम विभागाकडून एक वर्ष झाला विभागाकडे आला आहे. अर्थ संकल्प २१-२२ या वर्षात मंजुरात झाला असून, अंदाजपत्रक मंजूर करण्याकरिता मुंबई येथून सविस्तर अंदाजपत्रक व निविदा काढल्यानंतर रस्त्याचे काम सुरू करू.
-व्ही.जी. ताठे, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोट