लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वसतिगृहात राहणाऱ्या विद्याथिनींना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विविध कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींनी गुरुवारी आंदोलन केले. शेकडो विद्यार्थिनींनी दुपारी १२ वाजता कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावर धडक दिली.कृषी अभ्याक्रमाकडे विद्यार्थिनींचा कल वाढला असून, एकूण विद्यार्थ्यांपैकी ५५ टक्के विद्यार्थिनी येथे विविध कृषी विषयांचे शिक्षण घेत आहेत. यासाठी येथे तीन मुलींची वसतिगृहे आहेत; परंतु या वसतिगृहात कोणतीच सुविधा नसून, अन्नही निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थिनींकडून करण्यात आला. वसतिगृहाची साफसफाई केली जात नाही. जखमी, आजारी कुत्री वसतिगृहात फिरतात. या ठिकाणी सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून, आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. वसतिगृहात राहणे मुश्कील झाल्याने विद्यापीठ प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थिनींनी केली.विद्यापीठात एकूण विद्यार्थ्यांपैकी ५५ टक्के मुली शिक्षण घेत असून, त्यांना सुविधा पुरविण्यात कृषी विद्यापीठ कटिबद्ध आहे. नवीन वसतिगृहाचा प्रस्ताव आहे. त्यासाठीची मागणी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे करण्यात आली आहे.- डॉ. व्ही.एम. भाले, अधिष्ठाता कृषी,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
पंदेकृविच्या विद्यार्थिनींचे आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:34 AM