अकोला: शहरातील निमवाडी परिसरातील जागेमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. शनिवारी केंद्रीय बांधकाम विभागाच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी अकोल्यात येऊन जागेची पाहणी केली. प्राथमिक स्तरावर परिसरात विद्युत पुरवठा व्यवस्था उभारण्यावर अभियंत्यांनी भर दिला आहे. येत्या काही दिवसातच जागेमध्ये विद्युत व्यवस्था उभारण्यात येणार आहे. चार ते पाच महिन्यांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयांतर्गत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर झाले. हॉस्पिटल बांधकामाला केंद्र शासनाने मंजुरीही दिली. नागपूर येथील केंद्रीय बांधकाम विभागाच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी अकोल्यात येऊन अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याशी हॉस्पिटल बांधकामासंदर्भात चर्चा केली. निमवाडी परिसरामध्ये सहा मजली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याने, सर्वप्रथम विद्युत व्यवस्था उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून केंद्रीय बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या सहा सदस्यीय अभियंत्यांनी पाहणी केली. परिसरामध्ये एक्स्प्रेस फिडरसह किती मेगावॅट विजेची गरज भासेल, यासह इतर विषयांवर चर्चा झाली. लवकरच विद्युत व्यवस्था उभी करण्याच्या कामास सुरुवात होईल. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. आनंद आसिया, डॉ. दिनेश नैताम, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांची उपस्थिती होती.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी हालचाली सुरू!
By admin | Published: January 12, 2016 1:50 AM