अकाेला: काेराेनाचे सावट दूर ठेवत आता राजकारण बऱ्यापैकी अनलाॅक झाले आहे. पक्ष प्रवेशाच्या साेहळ्यापासून तर लहानसहान बैठका व आंदाेलनाच्या माध्यमातून आगामी निवडणुकीच्या तयारीत राजकीय पक्ष लागले असून, अकाेला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवर डाेळा ठेवत पक्षाचे महानगर अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक प्रवीण कुंटे यांनी अकाेला शहरात दाखल हाेऊन चाचपणी केल्याने राष्ट्रवादीमधील अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे.
अकोला महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रवादीची स्थिती कागदावरच मजबूत आहे. राष्ट्रवादीमधील सर्व नेत्यांची माेठी फळी अकाेला शहरातच वास्तव्याला आहे; मात्र महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला सत्तेपर्यंत पाेहोचविण्यात हे सर्वच नेते अपयशी ठरले आहेत. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे केवळ 5 नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत काॅंग्रेससोबत सुरू असलेली आघाडीची बाेलणी अंतिम क्षणी फिस्कटल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेस स्वबळावर लढली; मात्र काॅंग्रेसच्या तुलनेत यश मिळवू शकली नाही. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा महापालिका निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. या अनुषंगानेच पक्ष निरीक्षक प्रवीण कुंटे यांनी अकाेला शहरात दाखल हाेत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेत आगामी निवडणुकीसाठी आघाडीपासून तर महानगरध्यक्षांच्या निवडीपर्यंत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महानगर अध्यक्ष पदाच्या शर्यतीत विद्यमान अध्यक्ष राजू मूलचंदाणी यांच्यासह विजय देशमुख, रफीक सिद्दिकी, जावेद जकारिया यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. या नावा व्यतिरिक्त नवा चेहरा देण्याचाही प्रयत्न करावा, अशी भूमिकाही काही नेत्यांनी मांडली आहे. त्यामुळे निरीक्षकांचा पक्षाकडे काय अहवाल जाताे, याकडे इच्छुकांचे लक्ष लागलेले आहे.