राजेश शेगाेकार
अकाेला : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी विदर्भाचा दाैरा गेल्या आठवड्यात संपविला. त्यांच्या दाैऱ्यात त्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाचे संकेत दिले असल्याने पश्चिम वऱ्हाडातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा व महानगर अध्यक्षपदासाठीचे लाॅबिंग वेगाने सुरू झाले आहे.
अकाेला, बुलडाणा, वाशिम हे तिन्ही जिल्हे मिळून १५ मतदारसंघ आहेत; मात्र सद्यस्थितीत वाशिममध्ये अमित झनक तर बुलडाण्यात राजेश एकडे वगळता एकाही मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळविता आलेला नाही. या पृष्ठभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी विदर्भात संघटनेची नव्याने उभारणी करण्यासाठी केलेल्या दाैऱ्यात नव्या नेतृत्वाची चाचपणी करण्यात आली आहे. खुद्द पटाेले यांनीच लवकरच संघटनात्मक फेरबदल केले जातील असे जाहीरपणे संकेत दिल्यामुळे पदांसाठी इच्छुक पदाधिकाऱ्यांनी पटाेलेंचा दाैरा संपताच ‘लाॅबिंग’ सुरू केल्याची विश्वसनीय माहिती आहे. अकाेल्यात काँग्रेसच्या हाती एकही माेठे सत्ताकेंद्र नाही त्यामुळे अकाेल्यातील संघटनेत आमूलाग्र बदल केले जाण्याची चिन्हे आहेत. अकाेला जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये पर्यायांची माेठी यादी आहे. प्रकाश तायडे, अशाेक अमानकर, प्रशांत गावंडे, पुरुषाेत्तम दातकर, डाॅ. सुधीर ढाेणे, महेश गणगणे यांच्या नावांची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. तर महानगर अध्यक्षपदासाठी अविनाश देशमुख, राजेश भारती, प्रदीप वखारिया, नितीन ताकवाले, निखिलेश दिवेकर, प्रशांत वानखडे आदी नेत्यांच्या नावाची यादी आहे. काही नेत्यांनी या नावांमधून आपल्याच गाेटातील नावासाठी पक्षश्रेष्ठींकडे जाेरदार पाठपुरावा केल्याचीही माहिती आहे. बुलडाण्यात जिल्हाध्यक्ष आ. राहुल बाेंद्रे यांच्यावर गटबाजीला खतपाणी घातल्याच्या तक्रारी अनेकांनी पटाेले यांच्याकडे केल्या आहेत त्यामुळे पटाेले यांनी बुलडाण्याचा भाैगाेलिक विस्ताराचे कारण समाेर ठेवत लवकर कार्याध्यक्ष दिला जाईल असे जाहीर केले त्यामुळे बुलडाण्यात माेठ्या प्रमाणात फेरबदल हाेण्याचे संकेत आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठीही इच्छुकांची माेठी यादी असून विद्यमान जिल्हाध्यक्ष राहुल बाेंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश पाटील अवचार, ॲड.जयश्री शेळके अशा नावांची चर्चा आहे. जिल्हाध्यक्ष घाटावरच दिला तर कार्याध्यक्ष हा घाटाखालचा असा प्रादेशिक समताेल येथे साधला जाईल.
वाशिममध्ये अनेक वर्षांपासून न बदलण्यात आलेले जिल्हाध्यक्षपद बदलण्याची चिन्हे आहेत; मात्र येथे काँग्रेसचे कार्यकर्ते गटातटातच जास्त विखुरले असल्याने अध्यक्षपदासाठी नावांच्या निवडीवर मर्यादा आहेत त्यामुळे ॲड. दिलीप सरनाईक यांनाच मुदतवाढ दिली जाते की आमदार अमित झनक यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
कार्याध्यक्षपदाची निर्मिती
ज्याप्रमाणे राज्यस्तरावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा भार कमी करण्यासाठी कार्याध्यक्षपदाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर अशाच प्रकारे पदांची निर्मिती करून पक्षीय सत्तेत सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा पर्याय काँग्रेसकडे आहे. बुलडाण्यात असे पद निर्माण करण्याची घाेषणाच पटाेलेंनी केली आहे त्यामुळे हाच पॅटर्न इतरत्रही वापरला जाऊ शकताे.
कुणाल पाटलांकडे अनेकांचे लाॅबिंग
काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्याकडे अमरावती विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या मार्फतही अनेक इच्छुकांनी पदासाठी लाॅबिंग केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पटाेलेंच्या दाैऱ्यात आ.पाटील यांना भेटून अनेकांनी जबाबदारी देण्याबाबत विनंती केली असल्याचेही समजते.