अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत, कारभारात सुधारणा करण्याचा सल्ला सभापतींना देण्यात आला. कारभारात सुधारणा न केल्यास खात्यांच्या प्रभारात बदल करण्याचे संकेत देण्यात आल्याने, जिल्हा परिषद सभापतींकडील खात्यांच्या प्रभारात फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि विकासकामांची अंमलबजावणी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून योग्य पद्धतीने केली जात नसून, सदस्य आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कायकर्त्यांना विचारात न घेता कामे केली जात असल्याच्या तक्रारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश उपाख्य, बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रमोद देडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, दिनकर खंडारे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष तथा आरोग्य, अर्थ, शिक्षण व बांधकाम सभापती सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या सभापतींनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासह जनतेच्या कामांसाठी वेळ ध्यावा, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन कामे केली पाहिजे. त्यासाठी कारभारात सुधारणा करा; अन्यथा सभापतींकडील खात्यांच्या प्रभारात फेरबदल करण्यात येणार असल्याचे संकेत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीत दिले. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेतील सभापतींच्या खात्यांच्या प्रभारात फेरबदलाच्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी जनता व चळवळीशी बांधिलकी न ठेवल्यास, बेशिस्तपणा केल्यास गय केली जाणार नाही. कारभारात सुधारणा न केल्यास जिल्हा परिषद सभापतींच्या खात्यांच्या प्रभारात बदल होऊ शकतो.
- डॉ. धैर्यवर्धन पुंडकर
प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी