अकोला - शहरासह जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्या गावगुंडांसह विविध टाेळीच्या म्हाेरक्यांचा बंदाेबस्त करण्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी बाह्यावर खाेचल्या आहेत. जुने शहरातील खिडकीपुरास्थित कुख्यात गुंड इमरान खान रहिम खान (२९) याच्याविराेधात ‘एमपीडीए’चे हत्यार उपसण्यात आले. शुक्रवारी इमरान खान याला एक वर्षांच्या कालावधीसाठी कारागृहात स्थानबध्द करण्यावर शिक्कामाेर्तब केले. गत अडीच महिन्यांच्या कालावधीत ‘एमपीडीए’अंतर्गत ही नववी कारवाइ असल्याने शहरातील खंडणीबहाद्दरांसह गावगुंडांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बाेलल्या जात आहे.
जुने शहरातील खिडकीपुरास्थित कुख्यात गुंड इमरान खान रहिम खान याच्यावर यापूर्वी घातक हत्यारांचा वापर करून गंभीर दूखापत करणे, जबरी चोरी,प्राणघातक हल्ला करणे, घरांवर कब्जा करण्याच्या उद्देशातून अतिक्रमण करणे, शांतताभंग करण्याच्या उद्देशातून अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपट करणे, दंगा घडविणे आदींसह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. इमरान खानवर यापूर्वी अनेकदा प्रतिबंधक कार्यवाही देखील करण्यात आली होती. परंतु तो प्रतिबंधक कार्यवाहीला जुमानत नसल्याची गंभीर दखल जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घेत त्याच्याविराेधात ‘एमपीडीए’ एक्टनुसार स्थानबध्द करण्याचे निर्देश पाेलिस यंत्रणेला दिले हाेते. पाेलिसांनी गुन्ह्यांची माहिती घेऊन तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाची जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, सदर गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री हाेताच त्याला एक वर्षांच्या कालावधीसाठी अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याचा आदेश १४ मार्च राेजी मंजूर केला.
यांनी तयार केला प्रस्ताव‘एसपी’सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, ‘डीवायएसपी’ सतीष कुलकर्णी, ‘एलसीबी’चे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके,‘पीएसआय’ आशिष शिंदे, ज्ञानेश्वर सैरिसे, उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, तसेच जुने शहर पाेलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, पोहेकॉ. संतोष मेंढे, स्वप्नील पोधाडे यांनी सविस्तर प्रस्ताव तयार केला.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे धाेरण आहे. खंडणीबहाद्दर व टाेळ्या चालविणाऱ्यांनी बस्तान गुंडाळण्याची गरज आहे. अन्यथा कठाेर कारवाया केल्या जातील. -बच्चन सिंह पाेलिस अधीक्षक