अकोला: वारंवार गुन्हे करणाऱ्या व पाेलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाइला ठेंगा दाखवणाऱ्या अकाेटफैलस्थित भिम चाैकातील अट्टल गुन्हेगार सम्राट विजय सावळे (वय ३०) याच्या विराेधात जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘एमपीडीए’चे हत्यार उपसले आहे. या कायद्यानुसार सराइत सम्राट सावळेला एक वर्षांसाठी कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. पाेलिसांच्या कारवाइमुळे गावगुंडांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बाेलल्या जात आहे.
अकाेटफैलस्थित भिम चाैकातील रहिवाशी कुख्यात गुंड सम्राट विजय सावळे याच्यावर यापुर्वी घातक हत्यारांनी हल्ला करुन दुखापत करणे, गृहअतिक्रमण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देऊन परिसरात दहशत निर्माण करणे, अश्लील कृती करणे, बेकायदेशीर जमावाला चिथावणी देऊन दंगा करणे, बेकायदेशिररित्या शस्त्र बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविराेधात अनेकदा प्रतिबंधक कारवाइ केल्यानंतरही ताे पाेलिसांना जुमानत नसल्याची बाब जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गंभीरतेने घेतली. कुख्यात सम्राटच्या गुन्हेगारी वृत्तीला आळा बसावा यासाठी पाेलिस प्रशासनाने स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर केला हाेता. या प्रस्तावाला अजित कुंभार यांनी मंजूरी देताच पाेलिसांनी १ जून राेजी कुख्यात सम्राट सावळेला अटक करुन त्याची एक वर्षांच्या कालावधीसाठी कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाइ जिल्हा पोलिस अधीक्षक सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एसडीपीओ’ सतिष कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके, ‘पीएसआय’आशिष शिंदे, उदय शुक्ला यांच्यासह अकाेटफैल पाेलिसांनी केली.
गावगुंडांचा कठाेरपणे बंदाेबस्त कराजिल्ह्यासह शहरात संघटित हाेऊन टाेळीने गुन्हा करणारे, खंडणीखाेर, जीवे मारण्याची धमकी देणारे तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या गावगुंडांचा कठाेरपणे बंदाेबस्त करण्याचे निर्देश जिल्हा पाेलिस अधीक्षक सिंह यांनी पाेलिस यंत्रणेला दिले आहेत. अशा गावगुंडांची कुंडली जमा करण्याची सूचना ‘एसपीं’नी दिली असून यंत्रणा कामाला लागल्याची माहिती आहे.