आशिष गावंडे/अकोला
अकोला: रिपाइं आठवले गटाचा महानगराध्यक्ष कुख्यात गुंड गजानन कांबळे याच्यावर ‘एमपीडीए’अॅक्ट नुसार कारवाइ करीत त्याला एक वर्षांसाठी कारागृहात स्थानबध्द करण्याची कारवाइ पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. गजानन कांबळे हा तडीपार असतानाही ताे घरात दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखा व जुने शहर पाेलिसांनी त्याला अटक केली.
शहरातील वाशिम बायपासस्थित पंचशिल नगर येथे राहणारा कुख्यात गुंड गजानन काशिनाथ कांबळे (४९) याच्यावर यापूर्वी बलात्कार, जबरी चोरी करतांना दुखापत करणे, जमिन, भुखंड बळकावण्यासाठी एखादया व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापतीची भिती दाखवणे, लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे, आर्थिक फसवणूक,लुबाडणूक करणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होवून दंगा करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, धमकी, धाकदपट करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नूकसान करणे, प्रतिबंधक आदेशाचे वारंवार उल्लंघन करणे अशा बऱ्याच गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापुर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु त्याच्या वर्तणुकीत काहीही सुधारणा झाली नाही. त्याच्याविराेधात प्रतिबंधक कार्यवाही करूनही ताे पाेलिसांना जुमानत नसल्याच्या प्रकाराची जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गंभीर दखल घेत ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाइ करण्याचा निर्णय घेतला.
‘एसपीं’च्या प्रस्तावाला मंजूरी‘एसपी’सिंह यांनी कुख्यात गुंड कांबळे याला स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर केला हाेता. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वत:चे स्त्रोताव्दारे माहिती घेतली असता, गजानन कांबळे हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाली. त्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात स्थानबध्द करण्याचा आदेश २६ फेब्रुवारी राेजी पारित केला.
तडीपार असतानाही सापडला घरीगजानन कांबळे याला सहा महिन्यांसाठी शहराबाहेर तडीपार करण्यात आले हाेते. तरीही ताे घरात दडून असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यावरुन मंगळवारी रात्री कांबळे याला स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके, जुने शहर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, ‘पीएसआय’ आशिष शिंदे, ज्ञानेश्वर सैरिसे, उदय शुक्ला, बाळापूर पाेलिस स्टेशन येथील ‘एपीआय’ पंकज कांबळे यांनी घरून अटक केली.