२१ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत अकोला शहरातील १८ केंद्रांवर ‘एमपीएससी’ची परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४ हजार ९७७ परीक्षार्थी परिक्षेसाठी प्रविष्ट आहेत. त्यानुषंगाने प्रशासनामार्फत परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. ‘एमपीएससी’ परिक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत १८ केंद्रप्रमुख, ७६ पर्यवेक्षक, २४४ समवेक्षक व ५ समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षेच्या कामासाठी नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना परीक्षा प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी
कोवीड कीटचे वाटप!
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी प्रशासनामार्फत कोवीड कीट साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी परिक्षार्थी उमेदवारांसाठी हॅन्डग्लोज, मास्क, सॅनिटाझर तसेच पर्यवेक्षणासाठी नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी फेसशिल्ड, हॅन्डग्लोव्हज, सॅनिटाझर याशिवाय कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आढळून येणाऱ्या उमेदवारांसह समवेक्षकांसाठी ‘पीपीइ कीट’ देखिल वितरीत करण्यात आल्या आहेत.असे परीक्षा नियंत्रक तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगीतले.