लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुंतवणुकीच्या नावाखाली शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्री सूर्या कंपनीचा संचालक समीर जोशी याला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याच प्रकरणात शंतनू कुर्हेकरही आरोपी आहे. श्री सूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा संचालक समीर जोशी व त्याची पत्नी पल्लवी जोशी यांनी अकोल्यासह राज्यातील अनेक शहरांमधील गुंतवणूकदारांना कंपनीच्या विविध आकर्षक योजनांचे आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची रक्कम गुंतवणूक केली होती. गुंतवणूक केलेली रक्कम दामदुप्पट व भरघोस व्याज देण्याचे आमिष दाखवून राज्यातील नागरिकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविले. या प्रकरणात समीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी व एजंटवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. समीर जोशी नागपूर कारागृहात असून, त्याच्या पत्नीची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. रामदासपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हय़ात समीर जोशीला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ६ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे अँड. आशिष देशमुख यांनी कामकाज पाहिले.
पितळे पिता-पुत्र हजर नाही!श्री सूर्या घोटाळय़ात अनेकांना गंडविणारे एजंट मोहन पितळे व मुकुंद पितळे हे जामिनावर सुटल्याची माहिती आहे. मात्र, त्यानंतर या दोघांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. हे दोघेही न्यायालयात हजर होत नसल्याची माहिती समोर आली आहे.