अकोला : महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्यावतीने राज्यभरातील ग्राहकांच्या सुविधेसाठी सातत्याने नवनवीन उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणच्या वीजपबिलावरील ग्राहकांच्या पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणच्यावतीने अधिकृत मोबाइल नोंदणी केलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठविण्यात येत असून, त्याद्वारे ग्राहकांना आपल्या पत्त्याची दुरुस्ती करता येणार आहे.मागील दोन दिवसात राज्यातील सुमारे ५२ हजार ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला असून, इतरांनीही याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.महावितरणच्या ज्या ग्राहकांनी आपला अधिकृत मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदविला आहे, अशा ग्राहकांना महावितरणच्यावतीने एसएमएस पाठविण्यात येत आहे. या एसएमएसवरील लिंक ओपन केल्यास त्यावर ग्राहकाचा पत्ता उपलब्ध असणार आहे. त्या पत्त्यात दुरुस्ती करण्याची सुविधा सदर लिंकद्वारे ग्राहकांना देण्यात आली आहे. यात ग्राहकांना कुठलाही आर्थिक भार सोसावा लागणार नाही.वीज बिलावरील पत्त्याची दुरुस्ती झाल्यामुळे ग्राहकांना वेळेत बिल मिळणे, योग्य वेळेत रिडिंग करणे या प्रक्रियेत अधिक अचुकता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनाही वेळेत वीज बिल भरुन महावितरणच्या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. राज्यात महावितरणचे सुमारे २ कोटी ५० लाखापेक्षा अधिक ग्राहक आहेत. त्यापैकी १ कोटी ९५ लाख ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाइलची नोंदणी महावितरणकडे केली आहे. मोबाइलवरील एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असेही आवाहन महावितरणने केले आहे.