तेल्हारा
तालुक्यातील पाथर्डी-राणेगाव शिवारात पाथर्डी येथील नितीन दत्तात्रय इसमोरे याचा शेतातील विद्युत खांबावर काम करीत असताना विजेचा जबर धक्का बसल्याने, मृत्यू झाला. गावामध्ये लाईनमन येत नसल्यामुळे काही शेतकरी नितीन इसमोरे याला कामासाठी बोलावत होते. लाईनमन कासदे यांच्या हाताखाली नितीन इसमोरे हा काम करायचा. त्याच्या मृत्यूस महावितरणचे कार्यकारी अभियंता अग्रवाल, कनिष्ठ अभियंता सरकटे, लाईनमन कासदे हे जबाबदार आहे. असा आरोप गुरुदेव दत्तात्रय इसमोरे यांनी २१ जूनला तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीतून केला आहे. गावातील लाईनमन कासदे यांच्या सांगण्यानुसार नितीन इसमोरे हा इलेक्ट्रिकचे काम करीत होता. गावात वीज संबंधी काहीही समस्या उद्भवल्यास लाईनमन कासदे हे माझ्या भावाला फोन करून काम करण्यास सांगत असे. २० जून रोजी त्याला लाईनमन कासदे यांचा फोन आला. त्यांनी त्याला गोवर्धन वाघ व दिलीप कुबडे रा. राणेगाव यांच्या शेतातील विजेच्या खांबावरील दुरूस्तीचे काम सांगितले होते. वीज खांबावर काम करताना, त्याला विजेचा जबर धक्का बसला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे लाईनमन कासदे, महावितरणचे कार्यकारी अभियंता अग्रवाल, कनिष्ठ अभियंता सरकटे,महावितरणचे कार्यकारी अभियंता अग्रवाल, कनिष्ठ अभियंता सरकटे यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा. अशी मागणी गुरुदेव इसमोरे यांनी तक्रारीतून केली आहे.
नितीन इसमोरे यांचा विजेचा जबर धक्का लागल्याने मृत्यू झाला. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली असून, या तक्रारीनुसार चौकशी करून कारवाई करू.
-नितीन देशमुख,
ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा