संतोषकुमार गवई
पातूर: यंदाही मान्सूनपूर्व तयारीत महावितरण नापास झाल्याचे चित्र असून, तालुक्यातील असा एकही गाव नाही की, जेथे वीजपुरवठा बंद पडत नाही. सातत्याने वीज बंद पडत असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व प्रकाराकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.
तालुक्यात गत आठवड्यात सर्वत्र वादळी वारे सुटले होते. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात वादळाच्या प्रभावाने भुईमुगासह भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंब्यांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळाने तालुक्यातील महावितरणच्या वीजपुरवठा व्यवस्थेच्या मर्यादाही उघड्या पाडल्या आहेत. महावितरण मान्सूनपूर्व तयारीत नापास झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील असा एकही भाग नाही, की जेथे वीज वितरण व्यवस्था कोलमडली नसेल. वादळ आणि वारा सुटला की, दररोज अनेक भागात वीज पुरवठा बंद होतो. बहुतांश भागात एकदा गेलेली वीज २४ तास झाले तरी परतलेली नव्हती. ग्रामीण भागात तर सातत्याने वीज वितरण व्यवस्था कोलमडत आहे.
-------------------------------------
अद्याप सिंगल फेज पुरवठा नाही!
कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक ग्रामीण भागातील नागरिक वास्तव्य करण्यासाठी शेतात गेले आहेत. त्यांना रात्री वीज उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, महावितरणने अद्याप सिंगल फेज वितरणाची व्यवस्था केलेली नाही. यामुळे रात्री त्यांना अंधारात राहावे लागते.
-----------------------------------------
कमी कर्मचाऱ्यांवर चालतो महावितरणचा डोलारा!
एकतर महावितरणचे नियमित कर्मचारी कमी आहेत. ऑऊटसोर्स पद्धतीने नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेण्यात येत आहेत. त्यांना सुरक्षेची साधनेही देण्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे त्यांना जीव धोक्यात घालून कामे करावी लागत आहेत. कोरोनाच्या संकटकाळातही कोरोना योद्धा म्हणून काम करीत आहेत. यासंदर्भात सातत्याने त्यांच्याकडून मागणी करूनही साहित्य उपलब्ध करण्यात येत नाही. परिणामी अनेकांना काम करताना जीव गमावण्याची वेळ येऊ शकते.
--------------------------------------
इन्सुलेटर फुटण्याचे प्रमाण वाढले!
अनेक ठिकाणी तारा तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. तारांना खांबावर धरून ठेवण्याचे काम इन्सुलेटरच्या माध्यमातून होते. चिनी मातीच्या या इन्सुलेटरमुळे तारा सरकत नाहीत. तसेच एकमेकांना स्पर्श करत नाहीत. मात्र, तालुक्यातील अनेक ठिकाणी इन्सुलेटर अनेक वर्षांपासून बदललेले नाहीत. परिणामी पाणी पडल्यानंतर ते फुटत आहेत. परिणामी तारा सुट्या होऊन त्या एकमेकांना स्पर्श करत आहेत. परिणामी ठिणग्या उडून तारा तुटल्या आहेत. यामुळेच वीज बंद पडत आहे.
-------------------------------------------------
५० वर्षांपासून वीज तारा ‘जैसे थे’!
तालुक्यातील अनेक भागात वीज तारा ५० वर्षांपासून बदललेल्या नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील काही भागात वीज तारा तुटत असल्याचे प्रकार घडत आहेत. याकडे महावितरणने लक्ष देऊन वीज तारांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.