अकोला : वीजजोडणी घेतल्यापासून अकोला परिमंडळातील तब्बल सहा हजार २२० ग्राहकांनी एकदाही वीज बिलाचा भरणा केलेला नाही. अशा ग्राहकांना महावितरणने ‘ डिफॉल्टर ’ यादीत टाकले असून, त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी महावितरणने कारवाईचा मोर्चा त्यांच्याकडे वळविला आहे. महावितरणने घरगुती, वाणिज्यीक व औद्योगीक क्षेत्रातील ग्राहकांकडे असलेली ९३ कोटीची थकबाकी वसूल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. वसूली केली नाही तर कर्मचाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याने थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. वीजजोडणी घेतल्यापासून एकदाही बिल न भरणार्या ग्राहकांची संख्या परिमंडळात मोठी असल्याने महावितरणने त्यांच्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. वीजजोडणी घेतल्यापासून बिलांचा भरणा न करणारे परिमंडळात सहा हजार २२० ग्राहक आहेत . यांच्याकडे तब्बल दोन कोटी ६७ लाख ६५ हजार रुपयांची थकबाकी आहे . त्यामध्ये अकोला जिल्हयातील दोन हजार छप्पनं ग्राहकांचा समावेश असून त्यांच्या कडे ९१ लाख ६० हजार रूपयाची थकबाकी आहे. हिच थकबाकी बुलढाणा जिल्हयातील दोन हजार दोनशे चौऱ्यांशी ग्राहकांकडे ९७ लाख ९६ हजार रूपयाची आहे, तर वाशिम जिल्हयातील अठराशे ८० ग्राहकांनी एकही बिल न भरून ७८ लाख ०९ हजार रूपये थकविले आहे. त्यामुळे महावितरणने आपली वसूली मोहीम तीव्र करत या डिफॉल्टर ग्राहकांविरोधात जोरदार तयारी केली आहे . या मोहीमेत या प्रत्येक ग्राहकांची तपासणी करण्यात येणार अाहे . चौकशी करतांना जर ग्राहक वीज चोरी करत असल्याचे आढळून आले तर त्यांच्यावर विद्युत कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याबरोबर फौजदारीही दाखल करण्यात येणार आहे. तसेच यापुढे बिल नाही तर वीज नाही हा पवित्रा घेत महावितरण अकोला परिमंडळांकडून यापुढे वसूली मोहीम नाही तर फक्त वीज पुरवठा खंडित करण्याचीच कारवाई केली जाणार आहे . त्यामुळे महावितरणची ही कटू कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी वेळेत वीजबिलांचा भरणा करू सहकार्य करावे असे आवाहन अकोला परिमंडळातर्फे करण्यात येत आहे.
अकोला परिमंडळात ६ हजारापेक्षा जास्त ग्राहक 'डिफॉल्टर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 5:48 PM