अकोला : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर रिडिंग आणि वीज बिलात अचुकता व पारदर्शकता राहावी, यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रिडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाइलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.महावितरणने आॅगस्ट २०१६ पासून मोबाइल अॅपद्वारे मीटर रिडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीज बिलात मोठ्या प्रमाणात अचूकताही आली आहे. आता वीज मीटर रिडिंग प्रक्रियेत ग्राहकांना आपले मीटर रिडिंग तत्काळ तपासता यावे म्हणून महावितरणकडे नोंदणी केलेल्या अधिकृत मोबाइलवर ग्राहकांना मीटर रिडिंगच्या पूवसूचनेचा एसएमएस देण्यात येणार असून, यात सकाळी ८ ते १०, १० ते १२, दुपारी १२ ते ३ आणि ३ ते ५ या दरम्यान कोणत्या वेळेत रिडिंग घेतले जाणार आहे, याची माहिती दिली जाणार आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार असून, रिडिंग घेण्याच्या वेळेस ग्राहकांना उपस्थित राहून योग्य रिडिंग घेतले जात आहे अथवा नाही, याची खातरजमा करता येणे शक्य होणार आहे.राज्यातील गणेशखिंड, रास्तापेठ, कल्याण-क, नागपूर शहर मंडल, वाशी व ठाणे (मुंब्रा व्यतिरिक्त) अशा सहा मंडलात ग्राहकांना मीटर रिडिंगची पूर्वसूचना देण्याची प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे.