अकोला : थेट गावात जाऊन दिवसभर वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या समस्यांचे निराकरण करत विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी महावितरणच्याअकोला परिमंडळातील अकोला,बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात 'एक गाव-एक दिवस' हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
नुकताच राज्यातील मुख्य अभियंतासोबत झालेल्या व्हीडीवो कॉन्फरंन्सिंगमध्ये राज्याचे मा.ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी 'एक गाव एक दिवस' हा उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहे. यामध्ये रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सचे क्लिनिंग व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल करणे अशा प्रकारची कामे या उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र असल्यामुळे संक्रमण होणार नाही याची काळजी घेत प्रादुर्भाव नसलेल्या गावांमध्ये एक गाव एक दिवस उपक्रम यशश्वीरित्या राबविण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सुचना मुख्य अभियंता यांनी तीनही जिल्ह्यातील अधिक्षक अभियंताना दिले आहे. या उपक्रमात विजेच्या समस्या दिवसभरातच मार्गी लावण्यासाठी अधिक्षक अभियंतासह सर्व कार्यकारी अभियंते प्रयत्न करणार आहे.