आशिष गावंडे, अकाेला: राज्यभर गाजलेल्या अल्पवयीन दुहेरी हत्याकांड व सामुहिक बलात्कार प्रकरणातील दहा आराेपींची सबळ पुराव्याअभावी अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश शायना पाटील यांनी साेमवारी निर्दाेष मुक्तता केली. याप्रकरणातील इतर तीन आराेपींचा निकालापूर्वीच मृत्यू झाला हाेता.
शहरातील अल्पवयीन शाळकरी मित्र व मैत्रिण यांचे मृतदेह १४ जून २००८ रोजी गायगांव नजिकच्या बाराखोली रेल्वे पुलावर छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आले हाेते. या प्रकरणी सुरुवातीला उरळ पाेलिसांनी आत्महत्येच्या दिशेने तपास केला हाेता. परंतु नंतर तपासात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून मुलीसह मुलाची हत्या करुन त्यांना रेल्वे रूळावर फेकण्यात आल्याचे समाेर आले होते. त्यानुषंगाने याप्रकरणी २५ जून २००८ रोजी उरळ पोलिस स्टेशन येथे आरोपी मनीष खंडारे याच्यासह इतर १३ जणाविरूध्द भादंवि कलम ३७६ (जी), ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बहुचर्चीत खटल्यात एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली होती.
सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. या प्रकरणात एका आरोपीची नार्को टेस्ट करण्यात आली होती. दरम्यान, सदर प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपी विरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणी दरम्यान यातील तीन आरोपींचा मृत्यू झाला. यामध्ये एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुराव्या अभावी अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश श्रीमती शायना पाटील आरोपींची निर्दोष मुक्तता केली.