लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर जिल्हय़ात पावसाला सुरुवात झाली आहे; या हलका ते मध्यम पावसाने मूग, उडीद पिकांना संजीवनी मिळाली आहे. माना टाकलेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी व इतर खरीप पिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे. जिल्हय़ात गेल्या चोवीस तासांत १५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; पण हा पाऊस सार्वत्रिक दमदार नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यातील धरणातील जलसाठयातही घट सुरू आहे.शुक्रवारपासून पावसाला सुरुवात झाली असली, तरी या पावसाचे सार्वत्रिक स्वरू प नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. हा पाऊस तालुकानिहाय होत असल्याने पावसाची टक्केवारी वाढलेली दिसत आहे. असे असले, तरी या पावसाने माना टाकलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. मूग, उडीद या अल्पकालीन पिकांना हा पाऊस प्रचंड पोषक ठरला आहे. ही दोन पिके ऐन सणासुदीच्या पूर्वी परिपक्क होत असल्याने शेतकर्यांच्या हातात दिवाळी, दसर्याच्या अगोदर पैसा येतो. ही पिके काही ठिकाणी फुलोर्यावर, शेंगावर आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात ज्यांनी पेरणी केली, तेथे मुगाच्या शेंगा वाळल्या आहेत. काही ठिकाणा काढणीही सुरू झाली आहे; परंतु यावर्षी उशिरा पेरणी झाल्याने बहुतांश मूग, उडिदाचे पीक हिरवे आहे. दरम्यान, गेल्या १५ ते २0 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात १९ ऑगस्ट रोजी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील पातूर आणि बाळापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला, तर अकोट, तेल्हारा, बाश्रीटाकळी आणि मूर्तिजापूर तालुक्यात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पावसाची स्थितीशनिवारी पातूर तालुक्यात मंडळनिहाय सरासरी १0५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये पातूर मंडळात १९ मि.मी., बाभूळगाव २२ मि.मी., सस्ती २0 मि.मी., आलेगाव २६ मि.मी. आणि चान्नी मंडळात १८ मि.मी. पावसाची नोंद झाली. बाळापूर तालुक्यात १३४ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये बाळापूर मंडळात ३५ मि.मी., वाडेगाव १७ मि.मी., पारस २६ मि.मी., उरळ १४ मि.मी., हातरूण ११ मि.मी., निंबा २१ मि.मी., व्याळा १0 मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात सरासरी १९.१४ मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना लाभ होणार आहे, तर इतर पिकांसाठी पोषक ठरणार आहे. जिल्ह्यातील इतर भागात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. -