लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात महापालिकेच्या पार्किंगचा बोजवारा उडाला असून, नागरिकांची गैरसोय होत आहे. याचा परिणाम वाहतुकीच्या कोंडीवर होत आहे. पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उशिरा का होईना, महापालिका प्रशासनाला मुहूर्त सापडला असून, बाजार विभाग, नगररचना विभाग आणि ‘एनयूएलएम’ विभागाने संयुक्तरीत्या पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागांची आखणी केली आहे.शहरात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे जागा उपलब्ध आहेत. प्रशासनाने पार्किंगसाठी घोषित केलेल्या जागा भाडेपट्ट्यावर देण्यात आल्या. त्यासाठी रीतसर निविदा प्रक्रिया राबवून खासगी कंत्राटदारांसोबत करारनामा करण्यात आले. एकूणच, कागदोपत्री सर्व काही सुरळीत दिसत असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी आहे. पार्किंगसाठी मनपाने २२ जागा निश्चित केल्या आहेत. यापैकी गतवर्षी १२ जागांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यापासून मनपाला किमान १३ लाखांचा महसूल जमा होत असल्याची माहिती आहे. दुसरीकडे उर्वरित १० जागा तशाच पडून असल्याचे चित्र आहे. या १० जागांपैकी काही जागा शहरातील मुख्य बाजारपेठेत व मोक्याच्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहता पार्किंगसाठी कोण्याही कंत्राटदाराने सदर जागा मिळवण्यासाठी दाखवलेली उदासीनता संशयाचे जाळे निर्माण करते. या जागांचा नेमका कोण वापर करतो, याची प्रशासनाने खातरजमा करण्याची गरज आहे.दरम्यान, मनपाने शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा भाडेतत्त्वावर दिल्या. कालांतराने एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे संबंधित जागांचा करारनामा संपुष्टात आला आहे. तरीही काही कंत्राटदारांकडून अवैधरीत्या पार्किं ग शुल्क वसूल केले जात आहे. या प्रकाराकडे मनपाचे दुर्लक्ष कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.
मुहूर्त सापडला; पार्किंगच्या जागेची मनपाकडून आखणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 1:20 PM