अकोला: कोविडच्या उपचारानंतर अनेकांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसू लागली आहेत. अकोल्यात शेजारील जिल्ह्यांसह गुजरात, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश येथील रुग्णही अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्ह्यात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शनअभावी रुग्णांवर उपचारासाठी आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे ५० पेक्षा जास्त म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सर्वोपचार रुग्णालयात सद्यस्थितीत १०० पेक्षा जास्त म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. रुग्णांवर शस्त्रक्रियेची वेळ येऊ नये, यासाठी उपचारादरम्यान रुग्णांना इंजेक्शन देणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यात या इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे.
एका रुग्णाला पाच इंजेक्शनची गरज
म्युकरमायकोसिसच्या एका रुग्णाला उपचारादरम्यान किमान पाच इंजेक्शन दिली जातात. ही इंजेक्शन विविध चाचण्यांनंतरच रुग्णाला दिली जातात. रुग्णाच्या वजनानुसार त्याला इंजेक्शनची मात्रा दिली जाते, मात्र इंजेक्शनचा तुटवडा असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे.
रुग्णांचे बचावले डोळे
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्याने बुरशीचा फैलाव रोखण्यात यश मिळाले. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या सर्वच रुग्णांचे डोळे वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे, मात्र दात आणि सायनसमध्ये इन्फेक्शन वाढल्याने त्यावर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.
सर्वोपचार रुग्णालयात शेजारील जिल्ह्यासह शेजारील राज्यातील म्युकरमायकाेसिसच्या रुग्णांवरही उपचार झाले आहेत. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना बरे केले जात आहे. सुदैवाने जिल्ह्यात एकाही रुग्णाला डोळे गमवावे लागले नाहीत.
- डॉ. दिनेश नैताम, वैद्यकीय उपअधीक्षक, जीएमसी, अकोला