अकोला : दामले चौकातील रहिवासी तथा आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद व शेख शफी कादरी या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण करून ६५० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. या हत्याकांड प्रकरणातील १७ पैकी १४ आरोपी अटकेत असून, तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.आप नेते मुकीम अहमद हे त्यांचे मित्र शफी कादरी हे दोघे खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद कॉलनी येथील रहिवासी तसबुर कादरी यांच्या निवासस्थानी ३० जुलै रोजी रात्री जेवणासाठी गेले होते. त्यानंतर मुकीम अहमद यांचे वाहन गंगा नगर परिसरात बेवारस आढळले, तर ते मित्रासह बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नीने पोलीस अधीक्षकांकडे केली होती. यावरून पोलिसांनी तीन पथके गठित करून मुकीम अहमद व शफी कादरी यांचा शोध सुरू केला असता बुलडाणा जिल्ह्यातील पाथर्डी जंगलात या दोघांचेही मृतदेह पोत्यात बांधून फेकल्याचे समोर आले होते. यावरून पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन तब्बल १७ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी सुरू केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे, रामेश्वर चव्हाण व जुने शहरचे ठाणेदार अन्वर शेख यांनी १४ आरोपींना अटक केली. या हत्याकांड प्रकरणात मो. तसव्वुर कादरी, गौस खान, कौसल, शेख चांद, शेख इमरान शेख कदीर, शेख मुख्तार शेख नुर, सै. अस्लम सै. हुसेन, जब्बार खान सत्तार खान पठाण, सै. इक्बाल सै. मोहम्मद हुसेन, शब्बीर शहा अन्वर शहा, संदीप आत्माराम दातार, सै. महेफुज सै. महेबुब, इसाक खान, रजा उल्ला खान, अहमद खान भुरे खान, अब्दुल कुद्दुस अब्दुल मन्नान व शेख शादाब शेख शब्बीर या १७ आरोपींचा समावेश आहे. यामधील १४ आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.