अकोला : नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विविध अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात प्रचंड वाढ केली आहे. जवळपास ३५ ते ७५ टक्के असलेल्या शुल्कवाढीचा फटका गरीब विद्यार्थ्यांना बसत असल्याचे नमुद करत ही अविवेकी शुल्कवाढ कमी करण्याची मागणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्वत परिषद व वित्त समितीचे माजी सदस्य प्रा.डॉ.संजय खडक्कार यांनी राज्यपाल तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने बी.ए.-१ व बी.कॉम.-१ चे शैक्षणिक शुल्क रु.१७०२ वरून रु.२९८८ करण्यात आले आहे. बी.एस.सी.च्या अभ्यासक्रमात ५५ टक्के, डी.सी.एम.च्या अभ्यासक्रमात ३५ टक्के, एम.ए. अभ्यासक्रमांत ३६ टक्के अशी जवळपास सर्वांचं अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ५० टक्क्याहून जास्त विद्यार्थी हे बी.ए. व बी.कॉम. अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे याच अभ्यासक्रमांमध्ये मुक्त विद्यापीठाने नेमकी ७५ टक्के शैक्षणिक फी मध्ये वाढ केल्याने, समाजातील गरीब विद्यार्थी, जे पारंपरिक विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही,ते मुक्त विद्यापीठामध्ये पण पैशाअभावी प्रवेश घेऊ शकणार नाही, अशी परिस्थिती फी मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंना विविध अभ्यासक्रमांमध्ये केलेली शैक्षणिक शुल्क वाढ कमी करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी खडक्कार यांनी केली आहे.
प्रवेश शुल्क एकाच वेळी भरण्याची अटभरीस भर म्हणून या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले प्रवेश शुल्क एकाच वेळी भरण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. आतापर्यंत दोन टप्प्यात प्रवेश शुल्क भरण्याची मुभा विद्यार्थ्यांना होती. प्रवेश शुल्क एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची बाब असो की एकाच टप्प्यात प्रवेश शुल्क भरण्याची अट असो, त्यामुळे आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असलेले विद्यार्थी, ऐपती अभावी, प्रवेश न घेता,रडवेला चेहरा करून घरी परत जात असल्याचे बहुतांश अभ्यास केंद्रांचे म्हणणे आहे.
मुक्त विद्यापीठाच्या तिजोरीत १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहेत. त्यामुळे शैक्षणिक शुल्कात 'निर्दयी'पणे वाढ करून विद्यार्थ्यांवर भूर्दंड लावण्याची काहीच गरज नव्हती.- प्रा.डॉ.संजय खडक्कार, अकोला