अकोला : रेल्वेतील वाढती गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने मुंबई-हटिया ही आठवड्यातून दोन दिवस धावणारी अतिजलद विशेष गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार, १५ एप्रिलपासून सुरु होणार असलेल्या या गाडीला अकोला येथे थांबा असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे. ही गाडी २ मेपर्यंत चालणार आहे.
मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ कार्यालयाकडून प्राप्त माहितीनूसार, ०११६७ डाऊन मुंबई-हटिया ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनन्स, मुंबई येथून दर गुरुवार आणि रविवारी दुपारी १२.४५ वाजता सुटेल आणि हटिया येथे दुसर्या दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला येथे दर गुरुवार व रविवारी येणार आहे.
०११६८ अप हटिया - मुंबई ही विशेष गाडी हटिया येथून शुक्रवार आणि सोमवारी १८.२५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसर्या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला येथे थांबे असणार आहेत. १ द्वितीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ११ द्वितीय आसन श्रेणी अशी या गाडीची संरचना आहे. पूर्णपण आरक्षीत असलेल्या या गाडीत केवळ कन्फर्म तिकीटावरच प्रवास करता येणार आहे.