लोणार : आमदार आदर्श दत्तक ग्राम योजनेंतर्गत मेहकर विधानसभा मतदारसंघातील, लोणार तालुक्यात दाभा गावाला दत्तक घेणारे मुंबई-कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर १0ऑक्टोबर २0१५ रोजी गावाला भेट देणार आहेत, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी दिली आहे. केंद्राच्या सांसद ग्राम दत्तक योजनेच्या धर्तीवर राज्यातील गावे सक्षम करण्यासाठी राज्यात आमदार आदर्श दत्तक ग्राम योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी तालुक्यातील जांबूल गाव विकासासाठी दत्तक घेतल्यानंतर विधानसभेतील आपले सहकारी तथा मुंबई-कुर्ला मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांना लोणार तालुक्यातील दाभा हे गाव दत्तक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आमदार कुडाळकर यांनी आमदार आदर्श दत्तक ग्राम योजनेंर्तगत दाभा गाव विकासासाठी दत्तक घेतले. दरम्यान, आ. कुडाळकर हे १0 ऑक्टोबर २0१५ रोजी सकाळी १0 वाजता दाभाला भेट देऊन गावाची पाहणी करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवकुमार तेजनकर, उपसभापती डॉ. शिवकुमार आघाव हे उपस्थित राहणार आहेत. या योजनेंर्तगत एका आमदाराला पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघातील तीन गावे दत्तक घेऊन ती विकसित करावी लागणार आहेत. आमदार आदर्श दत्तक ग्राम योजना ही राज्य शासनाची महत्त्वपूर्ण योजना असून, ती ज्या गावात राबविण्यात येणार आहे, त्या गावात विकासकामे करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपल्बध करण्यात आहे. ऑक्टोबर महिन्यात या योजनेची गाइड लाइन येणार असल्याने सर्वच आमदारांनी आपण निवडलेल्या गावांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संबंधित गावाचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे.
मुंबई-कुर्लाचे आमदार करणार दाभा गावाची पाहणी
By admin | Published: October 09, 2015 1:56 AM